सव्वाशे वर्षे ‘झुकझुक’गाडीच!
By Admin | Updated: August 6, 2014 00:00 IST2014-08-05T23:51:36+5:302014-08-06T00:00:27+5:30
खासदारांनी दबावगट निर्माण केल्यास कोल्हापूर रेल्वेच्या ‘मेगाब्लॉक’चे ग्रहण सुटेल.

सव्वाशे वर्षे ‘झुकझुक’गाडीच!
सव्वाशे वर्षे ‘झुकझुक’गाडीच!
कोल्हापूरची रेल्वे बाल्यावस्थेत : ब्रॉडगेज व्यतिरिक्त ठोस विकास नाही; अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित
कोल्हापूरची रेल्वे शतकोत्तर रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करीत असताना, तिच्या विकासासाठी केवळ घोषणाच झाल्या, अंमलबजावणी मात्र काहीच झाली नाही. कोल्हापूर रेल्वेच्या विकासासाठी यापूर्वीच्या खासदारांचा केंद्रात दबाव पडला नसल्याचे दिसते. त्यामुळेच आजच्या बुलेट ट्रेनच्या युगात कोल्हापूरची रेल्वे धुरांच्या रेषा हवेत काढत जाणारी झुकझुक गाडीच आहे. आता नव्या खासदारांकडून कोल्हापूरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. खासदारांनी दबावगट निर्माण केल्यास कोल्हापूर रेल्वेच्या ‘मेगाब्लॉक’चे ग्रहण सुटेल.
प्रशांत साळुंखे --कोल्हापूर ,, कोल्हापूरच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी २१ एप्रिल १८९१ ला संस्थानाच्या खर्चातून कोल्हापूर-मिरज रेल्वेची सुरुवात केली. रेल्वेच्या माध्यमातून कोल्हापूर पुढे अनेक शहरांना जोडले गेले. दळणवळणाचे सोईचे साधन झाले. यातून पुण्यानंतर कोल्हापूर हे रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न मिळवून देत आहे. मात्र, गेल्या चाळीस वर्षांत ब्रॉडगेज व्यतिरिक्त ठोस विकास झाला नाही.
कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे अनेक प्रश्न आहेत, मात्र ते सोडविण्यासाठी कोल्हापूरचे दोन मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदारांचे प्रयत्न कमी पडत आहेत. यातील अनेकांना रेल्वे व स्थानकाचे प्रश्नही माहिती नाहीत.कोल्हापूर रेल्वेची अधोगती थांबविण्यासाठी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येण्याबरोबरच खासदारांनी दिल्लीत दबाव निर्माण करण्याची तितकीच गरज आहे.
पादचारी पूल झालाच नाही
मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा उड्डाण पूल, दोन नवीन तिकीट खिडक्या व प्लॅटफॉर्मची लांबी वाढविणे, आदी पावणेदोन कोटींच्या कामाची सुरुवात जानेवारी २०१४ मध्ये होणार होती. मात्र, अद्यापही येथील काम सुरू झालेले नाही. पादचारी पुलाबाबत मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी वाय. के. सिंग यांनी डिसेंबर २०१३ मध्ये आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन हवेतच गेले आहे.
प्लॅटफॉर्मअभावी गाड्यांना विलंब
एक्स्प्रेससाठी दोनच प्लॅटफॉर्म आहेत. त्यामुळे प्लॅटफॉर्ममधून गाडी निघाल्याशिवाय बाहेरील गाडी प्लॅटफॉर्मवर येऊ शकत नाही.
बाहेरून येणाऱ्या गाडीला रुकडी किंवा मार्केट यार्ड येथे थांबावे लागते. नवीन प्लॅटफॉर्म झाल्यास गाडीला होणारा विलंब टळणार आहे.
हातानेच गोळा केला जातो मैला
रेल्वेस्थानकावर साचणारा मैला हा गेल्या अनेक वर्षांपासून महिला-पुरुष कर्मचारी थेट हातानेच गोळा करीत आहेत.
रेल्वे प्रशासनाने त्यांना साधे हॅण्डग्लोज तसेच गमबूटही दिलेले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
आला आहे.
याकडे रेल्वेच्या संघटनांनी ज्या पद्धतीने आवाज उठवावयास हवा होता, तो उठवला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोणी वालीच
उरलेला नाही.
२९ गाड्या, फक्त ५ टीसी
कोल्हापूरमधून दर आठवड्याला २९ गाड्या या देशातील विविध भागात धावतात. या गाड्यांना प्रवाशांची संख्याही मोठी आहे.
मात्र, त्यांची तपासणी करण्यासाठी कोल्हापूर स्थानकावर केवळ पाच टीसी आहेत. त्यामुळे फुकट्या प्रवाशांचे
फावत आहे.
केवळ सर्वेक्षणच
कोल्हापूर-राजापूर, कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-सिंधुदुर्ग या मार्गांसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात आला होता. मात्र, हा सर्व्हे झाल्यानंतर पुढे काहीच पाऊल उचलले गेले नाही. हे मार्ग होण्यासाठी खासदारांनीही कोणतेही ठोस प्रयत्न केले नसल्याचे दिसते.
विस्तारीकण अद्याप नाही
रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि २ च्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव चार वर्षांपूर्वी पुणे विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, तो अद्याप धूळ खात पडून आहे.
सध्या प्लॅटफॉर्म १ वर केवळ ११ व प्लॅटफॉर्मवर २ वर २१ डबे, तर ३ वर केवळ १४ डबे उभारू शकतात. वाढीव प्लॅटफॉर्म नसल्यामुळे शेवटच्या पाच-सहा डब्यांतील प्रवाशांना तर उड्या मारूनच स्थानकावर उतरावे लागते.
जायबंदी, मृत्यूचे प्रमाण वाढले
कोल्हापुरातील रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची साडेतीन फूट आहे. ही उंची दोन फुटांनी वाढवून साडेपाच फूट करून रेल्वे डबा व प्लॅटफॉर्म समान उंचीवर करावेत, अशी प्रवाशांची मागणी आहे. प्लॅटफॉर्म व रेल्वेचा डबा यामध्ये मोठे अंतर राहत असल्याने अनेक वेळा अपघात होतात. दरवर्षी २५ ते ३० प्रवासी डबा व प्लॅटफॉर्म यामधील जागेत पडून जायबंदी होणे तसेच मृत्युमुखी पडत असल्याचे आकडेवारी सांगते.
रेल्वे गुडस यार्डमध्ये
या सुविधा हव्यात
पक्के सिमेंटचे रस्ते, पाणी, कँटीन, रेस्ट रूम, औषधे, मोठे स्वच्छतागृह, ‘हायमास्ट’ची आवश्यकता, रेल्वे सुरक्षा बलाची अपुरी संख्या आहे. व्यापाराच्या दृष्टीने रेल्वे गुड्स हे महत्त्वाचे आहे. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. येथे तातडीने सुविधा देण्याची गरज आहे.
हायटेक रेल्वेस्थानकासाठी प्रयत्न : महाडीक
कोल्हापूर रेल्वेचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव २०१५पासून सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर गेल्या रेल्वेबजेटमध्ये अनेक प्रश्न मांडले. त्याची नोंद रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी घेतली आहे. बजेटमध्ये कोल्हापूर-पुणे विद्युतीकरण-दुहेरीकरण, कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट, नागपूर, अहमदाबाद, दिल्ली, हावडा या गाड्या सुरु होण्यासाठी विषय मांडला. नोव्हेंबरला पुन्हा अधिवेशन असेल, त्यावेळी कोल्हापूर रेल्वेच्या मागण्या पदरात पाडून घेतल्या जातील. - धनंजय महाडीक, खासदार
२०१५ ला चेहरा-मोहरा बदलेल : शेट्टी
कोल्हापूर रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. कोल्हापूर रेल्वेचा २०१५ पासून शतकोत्तर रौप्यमहोत्सव सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मॉडेलस्टेशन होण्यासाठी रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांची लवकरच भेट घेणार आहोत. अनेक नव्या गाड्या सुरु करण्याबरोबरच प्रवाशांना सोई-सुविधाही मिळण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील. अधिवेशन झाल्यानंतर कोल्हापूर रेल्वे स्थानकाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाईल. तेथे जी आवश्यकता आहे, त्याबाबत रेल्वेचे विभागीय अधिकारी सुनिल शर्मा यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल. -राजू शेट्टी, खासदार
खासदारांनी लक्ष द्यावे : बियाणी
रेल्वे ही केंद्र शासनाच्या अखत्यारित येत असल्यामुळे यात खासदारांची मोठी भुमिका आहे. येथील स्थानकाचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी यापूर्वीचे खासदार अपयशी ठरले आहेत. आता मात्र या नव्या खासदारांकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा लागून राहिल्या आहेत. यासाठी खासदार धनंजय महाडीक व खासदार राजू शेट्टी यांनी मॉडेलस्टेशन, नव्या गाड्या, नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्म उंची वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- शिवनाथ बियाणी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे व पॅसेंजर असो.
नव्या खासदारांकडून अपेक्षा : शेटे
खासदार धनंजय महाडीक यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले. तसेच रेल्वे बजेटमध्ये कोल्हापूर रेल्वेचे प्रश्न मांडले. मात्र यापुढे मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी योग्य तो पाठपुरावा होणे महत्त्वाचे आहे. खासदार राजू शेट्टी हे सत्तेत असल्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांना कोल्हापूर स्थानक तसेच शाहू महाराज यांची दूरष्टी समजावून सांगून मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
- मोहन शेटे, रेल्वे अभ्यासक, निवृत्ती रेल्वे अधिकारी