बिल थकल्याने दूरध्वनी बंद
By Admin | Updated: July 4, 2015 23:46 IST2015-07-04T23:46:32+5:302015-07-04T23:46:32+5:30
तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहराची जबाबदारी असलेल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी मागील काही दिवसांपासून बंद असल्याने परिसरातील रहिवाशांची मोठी

बिल थकल्याने दूरध्वनी बंद
पनवेल : तालुक्याचे ठिकाण असलेल्या पनवेल शहराची जबाबदारी असलेल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी मागील काही दिवसांपासून बंद असल्याने परिसरातील रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. एखादी तक्रार अथवा सूचना द्यावयाची असेल तर ती कोणाकडे द्यावी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
पनवेल शहराची लोकसंख्या अडीच लाखांच्या घरात आहे. तसेच आजूबाजूचा ग्रामीण भाग देखील पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई - पुणे, मुंबई - गोवा तसेच जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गांचा समावेश आहे. या तिन्ही महामार्गांवर मोठ्याप्रमाणात अपघात होत असतात.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्याने आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. अनेकदा सामान्य नागरिक पोलीस ठाण्यात न जाता, केवळ दूरध्वनीवरून आपली तक्रार नोंदवतात. अशा नागरिकांना याचा अधिक फटका बसण्याची शक्यता आहे. परिसरातील घटनेची माहिती देण्यासाठी जरी १०० क्रमांकाची हेल्पलाईन सेवा उपलब्ध असली तरी अनेकजण स्थानिक पोलीस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधत असतात.
बिल न भरल्याने फोनसेवा बंद झाली असून क्षेत्रीय लेखा अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, अशी सूचना एमटीएनएलकडून दूरध्वनी करणाऱ्याला ऐकायला मिळते.
पनवेल शहरसह इतर पोलीस ठाण्यात देखील ही समस्या उद्भवली आहे. आम्ही यासंदर्भात प्रक्रिया पूर्ण करून बिले मंजुरीसाठी पाठविली आहेत. मात्र अशाप्रकारे पोलीस ठाण्याची अत्यावश्यक सेवा बंद करण्यापूर्वी पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे.
- शेषराव सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस आयुक्त, पनवेल.