Join us

मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 12:38 IST

CM Devendra Fadnavis News: दुःखातून निर्माण होणार्‍या करुणेचे मूर्तीमंत उदाहरण! सेवानिवृत्तीनंतर वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका ८२ वर्षीय आजोबांनी आपल्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाल्यावर अशा अन्य रुग्णांची पैशांसाठी होणारी वणवण राहून सरकारी सहाय्यता निधीत २० लाखांची देणगी दिली.

CM Devendra Fadnavis News: एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये, अशी आपली संस्कृती सांगते. दानाचे महत्त्व अगदी प्राचीन काळापासून विविध पद्धतीने अधोरेखित झालेले आहे. आधुनिक काळातही दानाचे महत्त्व कमी झालेले नाही. अडीअडचणीच्या काळात एखाद्या केलेली छोटीशी मदतही अत्यंत मोलाची ठरते. अनेकदा दान करणारी व्यक्ती आपले नाव गुप्त ठेवते. परंतु, काहीवेळेस दान देणाऱ्या व्यक्तीने कोणत्या आणि किती प्रतिकूल परिस्थितीतून देणगी दिली आहे, हे समजताच आश्चर्य वाटते आणि त्या व्यक्तीबाबत अनेकपटींनी आदर वाढतो. मुंबईत एका ८२ वर्षांच्या एका आजोबांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल २० लाखांची देणगी दिली आहे. परंतु, त्या मागील गोष्ट नक्कीच प्रेरणादायी म्हणावी लागेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर एक पोस्ट करत या आजोबांनी दिलेल्या २० लाखांच्या देणगीबाबत माहिती दिली आहे. दुःखातून निर्माण होणार्‍या करुणेचे मूर्तीमंत उदाहरण, असे लिहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८२ वर्षीय आजोबांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेल्या २० लाख रुपयांच्या देणगीबाबत सांगितले आहे. 

दुःखातून निर्माण होणार्‍या करुणेचे मूर्तीमंत उदाहरण!

८२ वर्षांचे सदानंद विष्णु करंदीकर आपल्या पत्नी सुमती करंदीकर यांच्यासह सेवानिवृत्त झाल्यानंतर अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात राहायला गेले. मात्र, मागील वर्षी सुमती करंदीकर यांचे कर्करोगाने निधन झाले. यादरम्यान कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी होणारी धडपड सदानंद करंदीकर यांनी जवळून पाहिली. त्यामुळे आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी कर्करोगग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ₹१० लाख, अशा एकूण ₹२० लाखांच्या देणगीचा धनादेश दिला. एकीकडे दुःखातून वेदना आणि नैराश्याची भावना निर्माण होणारी असंख्य उदाहरणे असताना दुःखातून करुणेच्या निर्मितीचे हे मूर्तीमंत उदाहरण. सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व असलेले श्री सदानंद विष्णु करंदीकरजी यांचे हे मानवतेचा शिखरबिंदू ठरणारे कार्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी राहील!, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज्य सरकार