वाहतूक कोंडीवर बोगद्यांचा उतारा, ४,३०० कोटींचा खर्च अपेक्षित : सहा महत्त्वाच्या भूमिगत मार्गांची मुख्य रस्त्यांना जोडणी 

By जयंत होवाळ | Updated: September 30, 2025 10:11 IST2025-09-30T10:11:20+5:302025-09-30T10:11:58+5:30

शहर आणि उपनगरांतील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने वाहतुकीसाठी जमिनीखाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याची योजना आखली आहे.

Tunnels to ease traffic congestion, expected cost of Rs 4,300 crore: Six important underground routes to be connected to main roads | वाहतूक कोंडीवर बोगद्यांचा उतारा, ४,३०० कोटींचा खर्च अपेक्षित : सहा महत्त्वाच्या भूमिगत मार्गांची मुख्य रस्त्यांना जोडणी 

वाहतूक कोंडीवर बोगद्यांचा उतारा, ४,३०० कोटींचा खर्च अपेक्षित : सहा महत्त्वाच्या भूमिगत मार्गांची मुख्य रस्त्यांना जोडणी 

जयंत होवाळ 
लोकमत न्यूज नेटवर्क


मुंबई : शहर आणि उपनगरांतील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेने वाहतुकीसाठी जमिनीखाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याची योजना आखली आहे. त्याकरिता चार हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पालिका या प्रकल्पात रस्त्यांच्या खाली अनेक बोगदे बनवणार आहे. त्यामुळे रस्त्यावरच्या वाहतुकीला जमिनीखालून एक नवीन आणि वेगळा मार्ग मिळेल. या प्रकल्पात  सहा महत्त्वाचे बोगदे असतील. हे बोगदे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडतील. हे बोगदे गोरेगाव-मुलुंड लिंक रोड आणि कोस्टल रोड यांसारख्या महत्त्वाच्या रस्त्यांना जोडले जातील. त्यामुळे वाहनचालक, नागरिकांची एका ठिकाणांहून दुसरीकडे जलद गतीने जाता येणार आहे. 

वाढत्या वाहनांमुळे, पर्यायी रस्ते गरजेचे 
मुंबईत गाड्यांची संख्या दरवर्षी  मोठ्या प्रमाणवर वाढत आहे, त्यामुळे भविष्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असा पर्यायी रस्ता तयार करणे खूप गरजेचे आहे.  हा प्रकल्प यशस्वी झाल्यास, मुंबईतील लोकांना एका भागातून दुसऱ्या भागांत जाण्यासाठी लागणारा वेळ खूप कमी होईल आणि शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल.

प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिता आम्ही निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर सल्लागाराची नियुक्ती होईल. 
अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका

पालिकेने निविदा मागवल्या
या प्रकल्पासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. निविदा मिळाल्यावर, काम सुरू करण्यापूर्वी  अभ्यास केला जाईल.

पूर्व-पश्चिम उपनगरांना लाभ 
मुंबईत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.  पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही वर्षांपूर्वी ठिकाठकाणी सिग्नल होते. त्यामुळे जंक्शनवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक एकवटत होती.  जंक्शनवरील कोंडी दूर करण्यासाठी त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आणि  सिग्नलचा अडथळा दूर झाला. मात्र, हे महामार्ग वगळता अन्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी काही कमी झालेली नाही. त्यामुळे बोगद्याच्या माध्यमातून मुख्य रस्ते जोडण्याचा विचार आहे. 

या प्रकल्पाचा विशेष फायदा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना होईल. ही दोन्ही उपनगरे सध्या विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड व सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडने जोडली गेली आहेत. भविष्यात अंधेरी-घाटकोपर लिंक रोडमुळे आणखी एक पर्याय उपलब्ध होईल.  बोगद्याच्या प्रकल्पामुळे आणखी पर्याय उपलब्ध होऊन सध्याच्या मार्गांवरील वाहतुकीचा भार  कमी होईल.

Web Title: Tunnels to ease traffic congestion, expected cost of Rs 4,300 crore: Six important underground routes to be connected to main roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.