मुंबई - गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे बोगदा खोदण्यासाठी टनेल बोअरिंग मशिन (टीबीएम) दाखल दाखल झाले आहे. यासाठीचे सर्व ७७ कंटेनर जपानहून आणले आहेत.
दुसऱ्या ‘टीबीएम’चे सर्व भाग डिसेंबरपर्यंत दाखल होणार असून, त्यानंतर १४.५ मीटरचा व्यास असलेल्या बोगद्याचे काम सुरू होईल. या कामासाठी आतापर्यंत साडेतीन मीटर खोल शाफ्ट खणण्यात आला आहे. टीबीएमने भुयारीकरणाचे काम सुरू करण्यासाठी तब्बल तीन लाख क्युबिक मीटर खनन करावे लागणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
१२.२० किमीचा प्रकल्प
मुंबईत पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता हा १२.२० किलोमीटरचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत दिंडोशी-गोरेगाव-दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान सहा पदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
डोंगराच्या खालून बाेगदे
जीएमएलआर अंतर्गत पश्चिम उपनगरांमध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड येथे खिंडीपाड्यापर्यंत जुळा आणि भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे. हे बोगदे नॅशनल पार्कच्या डोंगराच्या खालून जाणार आहेत. या भूमिगत बोगद्यात प्रवेशासाठी चित्रनगरी परिसरामध्ये पेटी बोगदा बांधण्यात येणार असून, त्याच्या भुयारीकरणासाठी ‘टीबीएम’चा वापर होईल.
वनस्पती, प्राण्यांना हानी नाही
बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, वायुवीजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश असेल. संजय गांधी नॅशल पार्कातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार व तुळशी तलाव यांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार आहे.