Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी नवरात्रोत्सवाला प्रमुख राज्य महोत्सवाचा दर्जा; स्थानिक लोककला, गोंधळी गीत, भारूड, जाखडी नृत्य या पारंपरिक कलांचे सादरीकरण होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 10:05 IST

नवरात्रीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि देशाच्या विविध भागांतून सुमारे ५० लाख भाविक श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होतात.

मुंबई : श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्य सरकारने राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा दिला आहे. हा महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत तुळजापूर येथे साजरा होणार आहे. या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत, भारूड, जाखडी नृत्य या पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल. गोंधळ, भजन आणि कीर्तन यांसारख्या धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

नवरात्रीत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि देशाच्या विविध भागांतून सुमारे ५० लाख भाविक श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होतात. या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवात स्थानिक लोककलांसह राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील प्रसिद्ध कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नवरात्र थीमवर आधारित ३०० ड्रोनद्वारे साकारलेला भव्य लाईट शो प्रमुख आकर्षण असतील.

महोत्सवाचे यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपण

राज्य पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ आणि यूट्यूब चॅनेलवर या महोत्सवाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.

या महोत्सवामुळे तुळजापूर परिसरातील नळदुर्ग किल्ला,

तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर

आणि परांडा किल्ला यासारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल.