Join us  

तुकाराम मुंढेंना सतावतेय मुलांच्या शिक्षणाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 3:16 PM

सततच्या होणाऱ्या बदलीनं मुंढेंनाही मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावते आहे.

मुंबई- नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राज्य शासनाने बदली केली असून, त्यांची मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिवपदी नियुक्ती केली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या बदलीसाठीचे प्रयत्न आणि अन्य चर्चा होत होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंढे यांच्या पाठीशी उभे राहिल्याने आमदारांसह महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करूनही उपयोग झाला नव्हता. परंतु अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने अवघ्या नऊ महिन्यांत पुन्हा बदली केली आहे.गेल्या 12 वर्षांतील मुंढे यांची ही अकरावी बदली आहे. त्यांची 2016पासूनची ही चौथी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याही आधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. सततच्या होणाऱ्या बदलीनं मुंढेंनाही मुलांच्या शिक्षणाची चिंता सतावते आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीकडे त्यांनी ही चिंता बोलून दाखवली आहे.ते म्हणाले, कोणतंही काम करायला पुरेसा वेळ मिळत नाही, याचं वाईट वाटतं. वेळ भेटल्यास सर्व गोष्टी सुरळीत करता येतील. मुलांच्या शाळा दरवर्षी बदलाव्या लागतात. त्यामुळे मुलांना शाळेत मित्र जोडता येत नाही, तसेच त्यांना इतरांशी मैत्री करता येत नाही. माझ्या दृष्टीनं ही नकारात्मक बाब आहे. मुलांच्या शाळा सारख्या सारख्या बदलल्या गेल्यानं त्यांना शिक्षणासाठी चांगलं वातावरण मिळत नाही. त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी एका ठिकाणी ठेवण्याचा माझा विचार सुरू आहे. जेणेकरून त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये. मुंढेंनी ही गोष्ट वृत्तवाहिनीकडे बोलून दाखवली आहे. 

टॅग्स :तुकाराम मुंढे