१५ निवासी डॉक्टरांना वर्षभरात क्षयरोग
By Admin | Updated: December 23, 2015 00:54 IST2015-12-23T00:54:47+5:302015-12-23T00:54:47+5:30
गेल्या १५ दिवसांत तीन महिला निवासी डॉक्टरांना क्षयाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान मुंबईतील १५ निवासी डॉक्टरांना क्षयाची लागण झाली आहे.

१५ निवासी डॉक्टरांना वर्षभरात क्षयरोग
मुंबई: गेल्या १५ दिवसांत तीन महिला निवासी डॉक्टरांना क्षयाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान मुंबईतील १५ निवासी डॉक्टरांना क्षयाची लागण झाली आहे.
रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यास क्षयासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. निवासी डॉक्टर सकाळपासून रात्रीपर्यंत रुग्णालयात कार्यरत असतात. सकाळी वॉर्डमध्ये राऊंडला जाणे. त्यानंतर बाह्यरुग्ण विभागात जाऊन रुग्णांच्या तपासण्या करणे. दुपारी दोन नंतर लेक्चरला जाणे. रात्री पुन्हा एकदा वॉर्डमध्ये राऊंडला जाणे. मधल्या वेळात थिसिसचा अभ्यास करणे, अशी निवासी डॉक्टरांची दिनचर्या असते. त्यामुळे अनेकदा त्यांच्यावर कामाचा ताण येतो. जेवणाच्या वेळा पाळता येत नाहीत.
सतत असेच काम करत राहिल्याने निवासी डॉक्टरांची प्रकृती ढासळते. अनेकदा त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. सतत रुग्णांच्या सानिध्यात असल्यामुळे निवासी डॉक्टरांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील ९० निवासी डॉक्टरांना क्षयाची लागण झाली आहे. तर, मुंबईतल्या ४५ निवासी डॉक्टरांचा समावेश असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
निवासी डॉक्टरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना प्रथिनयुक्त नाश्ता देण्यात यावा, कामाचे तास निश्चित करावेत अशी मागणी मार्डने केली आहे. हे डॉक्टर आठवड्याला १०० तास काम करतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. (प्रतिनिधीे)