मुंबई- मध्य रेल्वेवर सुरू झालेल्या नवीन राजधानी एक्स्प्रेसचा फायदा देशाच्या अनेक भागांना होणार आहे. या ट्रेनचा सध्याचा १८ तासांचा अवधी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी राजधानी एक्स्प्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नवीन राजधानी एक्स्प्रेससह अनेक प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. काही प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. रेल्वेमध्ये अन्य सोयी सुरू करण्यात येत आहेत. १०० रेल्वे स्थानकात उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. लोकल उशिराने धावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील हे प्रमाण बऱ्यापैकी सुधारले असून, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल ९५ टक्के वेळेत धावतात. रेल्वेवरील अपघात रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. देशामध्ये रेल्वे अपघात मृत्यूची संख्या कमी झाली आहे, असेही गोलय यांनी या वेळी सांगितले.राजधानी एक्स्प्रेसच्या उद्घाटन सोहळ्यात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासह अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार राज पुरोहित, आमदार आशिष शेलार, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वान आदी या वेळी उपस्थित होते.
‘राजधानी’चा १८ तासांचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न - पीयूष गोयल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 05:00 IST