सीसी फुटेजचे प्रयत्न निष्फळ?
By Admin | Updated: February 25, 2015 22:32 IST2015-02-25T22:32:14+5:302015-02-25T22:32:14+5:30
येथील टिळकनगरमधील भरवस्तीत असलेल्या उदयांचल सोसायटीमधील रहिवासी कल्पना लिमये यांच्या हत्येला पाच दिवस उलटले

सीसी फुटेजचे प्रयत्न निष्फळ?
डोंबिवली : येथील टिळकनगरमधील भरवस्तीत असलेल्या उदयांचल सोसायटीमधील रहिवासी कल्पना लिमये यांच्या हत्येला पाच दिवस उलटले असून अद्यापही पोलिसांच्या तपासाला यश मिळालेले नाही. सीसी कॅमेऱ्यांवरील फुटेजवर सुरक्षा यंत्रणेची भिस्त होती, मात्र त्यातून काहीही धागेदोरे मिळाले नसल्याचे तपासाधिकारी पोलीस निरीक्षक महादेव भोर यांनी सांगितले.
सीसीच्या फुटेजसंदर्भातून माहिती मिळविण्यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात ५ संगणकांच्या साहाय्यातून विविध अँगलने तपासणी केली. त्यातील सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचेही ते म्हणाले. रिक्षावाल्यांचीही चौकशी केली असून त्यातूनही काहीही ठोस माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
सूत्रांच्या माहितीनुसार या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसी कॅमेऱ्यांपैकी काही कॅमेरे कार्यान्वित नसून जे कार्यरत आहेत, त्यातून मिळालेले फुटेज हे अस्पष्ट-अंधूक आहेत. त्यातूनही काही मिळते का, यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. डीसीपी संजय जाधव यांनीही सोमवारी रात्री उशिरापर्यंत लिमये कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्यातूनही तपासाला गती मिळाली, अशी माहिती पुढे आली नसल्याचे सांगण्यात आले. सध्या तरी टिळकनगर पोलीसच या गुन्ह्याचा तपास करीत असल्याचेही भोर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)