रखडलेली कामे मार्गी लागणार
By Admin | Updated: February 10, 2015 00:39 IST2015-02-10T00:39:53+5:302015-02-10T00:39:53+5:30
पालिकेच्या कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रभाग सुधारणा, नगरसेवक निधी, पाणीपुरवठा आदींसह इतर महत्त्वाची कामे रखडलेली होती.

रखडलेली कामे मार्गी लागणार
ठाणे : पालिकेच्या कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रभाग सुधारणा, नगरसेवक निधी, पाणीपुरवठा आदींसह इतर महत्त्वाची कामे रखडलेली होती. परंतु, आता हळूहळू का होईना पालिकेची आर्थिक स्थिती सुधारत असल्याने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वर्षभरापासून सर्वच नगरसेवक या निधीच्या प्रतीक्षेत होते. परंतु,
आता या निधीतील कामांना मंजुरी मिळू लागल्याने प्रभागातील रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी २१०० कोटींचे मूळ अंदाजपत्रक सादर केले होते. परंतु, त्यानंतर महासभेने हेच अंदाजपत्रक २७०० कोटींचे केले. या वाढीव अंदाजपत्रकात वाढीव खर्चाची नोंद घेण्यात आली नव्हती. त्यामुळे मूळ अंदाजपत्रकाचा आकडा ६५०० कोटींनी वाढला. तसेच या अंदाजपत्रकाला कालावधी संपत आला असताना अधिकृत मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे हे अंदाजपत्रकच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.
विशेष म्हणजे स्पील ओव्हरच्या मुद्यावरून अनेक वेळा नगरसेवक आणि प्रशासनामध्ये खटके उडाले होते. त्यात डिसेंबरअखेर पालिकेला ४६ टक्के उत्पन्न मिळाले आणि त्यातील ४२ टक्के उत्पन्न खर्च झाले होते. तसेच प्रभागातील कामे होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होऊ लागल्याने नगरसेवकदेखील अडचणीत सापडले होते.
(प्रतिनिधी)