रस्त्यावरील खड्ड्यात ट्रक अडकला
By Admin | Updated: June 28, 2015 00:51 IST2015-06-28T00:51:49+5:302015-06-28T00:51:49+5:30
पावसाळ्यापूर्वी महापालिकेने रस्त्याची कामे पूर्ण केली. पण मुलुंड पश्चिमेकडील आरएचबी आणि गणेश गावडे रोडच्या मध्यावरच खड्डा पडल्याची घटना घडली.

रस्त्यावरील खड्ड्यात ट्रक अडकला
मुंबई : पावसाळ्यापूर्वी महापालिकेने रस्त्याची कामे पूर्ण केली. पण मुलुंड पश्चिमेकडील आरएचबी आणि गणेश गावडे रोडच्या मध्यावरच खड्डा पडल्याची घटना घडली. यामुळे रेती वाहून नेणारा ट्रक भररस्त्यात उलटला. मात्र, स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी ट्रकचालकाच्या चुकीमुळे खड्डा पडल्याचा दावा केला.
मुलुंड पश्चिमेकडील बाबाजी झोपडपट्टीसमोर ही घटना घडली. गुरुवारी चारच्या सुमारास रेतीने भरलेला ट्रक येथून जात असताना त्याचे मागचे चाक रस्त्यातच अडकून तो उलटला. काही महिन्यांपूर्वीच येथील रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना याचा नाहक फटका बसला. तब्बल चार तासांच्या कसरतीनंतर खड्ड्यात अडकलेला ट्रक बाहेर काढण्यात यश आले.
मात्र, याबाबत स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्याकडे विचारणा केली असता, ट्रकचालकाच्या चुकीमुळे येथे खड्डा पडल्याचे सांगून त्यांनी हात वर केले.