ट्रॉम्बेमध्ये पोलीस शिपायाला मारहाण
By Admin | Updated: June 2, 2017 06:15 IST2017-06-02T06:15:59+5:302017-06-02T06:15:59+5:30
पालिकेकडून अनधिकृत झोपड्यांचे पाडकाम सुरू असताना बंदोबस्तासाठी असलेल्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाला

ट्रॉम्बेमध्ये पोलीस शिपायाला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिकेकडून अनधिकृत झोपड्यांचे पाडकाम सुरू असताना बंदोबस्तासाठी असलेल्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायाला मारहाण केल्याची घटना बुधवारी देवनार परिसरात घडली. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये महिलेचाही समावेश आहे.
बुधवारी देवनारमधील पांजरपोळ परिसरातील अनधिकृत झोपड्यांवर पालिकेकडून पाडकामाची कारवाई सुरू होती. याच ठिकाणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई अमित झरेकर (३६) हे अन्य सहकर्मचाऱ्यांसोबत बंदोबस्तासाठी तैनात होते. कारवाई सुरू असताना दुपारी पावणे तीनच्या सुमारास स्थानिक समाजसेवक शकील शेख (३९) आणि त्याची पत्नी हफीजा (३३) यांनी अविंदर सिंग यांच्याशी वाद घातला. वाद सुरू होताच झरेकर वाद मिटविण्यासाठी पुढे सरसावले असता शेख दाम्पत्याने त्यांनाच शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या सहकारी पोलिसांनी दाम्पत्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. झरेकर यांच्या तक्रारीवरून मारहाण आणि शिवीगाळ करून सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांनी दिली.