मुंबई : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून विजया बँकेचे एटीएम लुबाडण्याचा प्रयत्न केलेल्या तिघांना समतानगर पोलिसांनी सोमवारी अटक केली. गाफिल्ड अॅन्थोनी मॅनेजस (४५), शिवम् उर्फ मोनू सुशील मिश्रा (२०) आणि मोहम्मद निराले मोजिम (२१) अशी त्यांची नावे आहेत. बिहार आणि मुंबईतील उपनगरातून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी एक पिस्तूल व गावठी कट्टा आणि १४ जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली आहेत.२२ नोव्हेंबरला त्यांनी एटीएम व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षा रक्षक मारुती सूर्यवंशी यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे प्रयत्न अयशस्वी ठरला. त्या वेळी अॅन्थोनीने हवेत गोळीबार करून पलायन केले होते. व्हॅनमध्ये एक कोटीची रोकड होती. त्याशिवाय कंपनीच्या अधिकाºयाकडे साडेदहा लाखांची कॅश होती. मात्र, सूर्यवंशी यांनी शौर्य दाखवित एका लुटारूच्या पोटाला रायफल लावल्यामुळे त्याचा कट अयशस्वी ठरला. त्यानंतर तिघांनी पळ काढला होता.पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेत त्यांचा शोध घेतला. अॅन्थोनी या कटाचा मुख्य सूत्रधार असून, त्याने अंधेरीच्या गॅरेजमध्ये काम करत असलेल्या दोघांना सोबत घेऊन व्हॅन लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने चोरीच्या स्कूटर घेऊन काही दिवसांपासून कांदिवली परिसरात पाहणी केली होती. तो बिहारला पळाल्याचे त्यांना समजले.त्यानुसार, पोलिसांचे एक पथक बिहारला दाखल झाले आणि या लुटीतील मोजिमला अटक केली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केल्याचे परिमंडळ-१२चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.
एटीएम व्हॅन लुटीचा प्रयत्न करणाऱ्या त्रिकूटाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 02:03 IST