Join us
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक विधी न करता स्मशानभूमी स्वच्छ करून वाहिली वडिलांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 02:28 IST

वडिलांच्या निधनानंतर कोणतेही धार्मिक विधी न करता, किंवा १३वे १४वे असे विधी न करता

मुंबई : सावदा जि. जळगाव येथील स्वातंत्र्य सेनानी शंकरअप्पा महाजन यांच्या निधनानंतर त्यांच्या तीन मुलांनी व नातेवाईक आणि मित्रपरिवाराने स्मशानभूमीची स्वच्छता करून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. मंत्रालयातील अधिकारी डॉ. अनिल महाजन यांचे ते वडील होते. मृत्यूसमयी त्यांचे वय ९७ वर्षे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

वडिलांच्या निधनानंतर कोणतेही धार्मिक विधी न करता, किंवा १३वे १४वे असे विधी न करता अनिल महाजन आणि परिवाराने पाचव्या दिवशी स्मशानभूमीतील कचरा गोळा केला. बसण्यासाठीच्या पायऱ्या स्वच्छ केल्या. भिंतीवर आणि सर्वत्र साचलेली राख साफ केली. स्मशानभूमी आणि अंत्यविधीचे मंडपगृह झाडून चकाचक केले. या कामात त्यांच्यासोबत एच.के. पाटील, विजय महाजन, दिलीप महाजन, डॉ. अमित महाजन, डॉ. तुषार पाटील, एच.के. पाटील, अ‍ॅड. राकेश पाटील, पंकज कुरकुरे आदी सहभागी झाले होते.या अनोख्या कामाचे पंचक्रोशीत कौतुक होत होते. शंकरअप्पा महाजन यांनी जीवनाची सुरुवात तलाठी म्हणून केली. पुढे महसूल विभागाशी त्यांचा संबंध आला. त्यांची अत्यंत तंदुरुस्त तब्येत हा अवघ्या पंचक्रोशीत कायम उत्सुकतेचा विषय होता. दुबार काष्टा, चोपून नेसलेले धोतर, पांढरा पूर्ण बाह्यांचा अंगरखा, डोक्यावर पांढरी टोपी आणि पाठीचा ताठ कणा ही त्यांची ओळख शेवटपर्यंत कायम राहिली.सावदा येथे त्यांनी हनुमान मंदिर, शिवदत्त व शनी मंदिराचे बांधकाम केले होते. रावेरचे उपनिरीक्षक रामदास वाकोडे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि पोलीस सहकाऱ्यांनी या स्वातंत्र्यसैनिकास मानवंदना दिली. अनिष्ठ रुढींना दूर सारून स्मशानभूमी स्वच्छता करून अनिल महाजन पुन्हा मुंबईत कार्यालयात रुजूही झाले. 

टॅग्स :मुंबईजळगाव