आदिवासी वाडे प्रकाशमय होणार!

By Admin | Updated: June 9, 2014 01:41 IST2014-06-09T01:41:23+5:302014-06-09T01:41:23+5:30

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगररांगातील आदिवासी वाड्यांपर्यंत वीज पोहोचण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

Tribal wade will be bright! | आदिवासी वाडे प्रकाशमय होणार!

आदिवासी वाडे प्रकाशमय होणार!

राहुल देशमुख, नेरळ
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगररांगातील आदिवासी वाड्यांपर्यंत वीज पोहोचण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा नियोजन मंडळाने आर्थिक तरतूद केल्यानंतर महावितरण कंपनीने गावापर्यंत विद्युत पुरवठा नेण्यासाठी सर्व उपाययोजना पूर्ण केली आहे. आदिवासी वाड्यांपर्यंत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेली विद्युत रोहित्रे बसविण्यात आली असून केवळ चार आदिवासी वाड्यांमध्ये वीज वाहिन्या खेचण्याचे काम बाकी राहिले आहे. दरम्यान,पावसाळा जवळ आल्याने दोनशे घरांमधील ग्रामस्थ वीजेच्या दिव्यांकडे डोळे लावून बसले आहेत.
माथेरानच्या डोंगरपट्ट्यातील सतरा आदिवासी वाड्यांपैकी चिंचवाडी आणि बेकरेवाडीमध्ये मागील वर्षी वीज पोहचली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास साठ वर्षाचा काळ लोटला, तरी येथील आदिवासी वाड्या आवश्यक मुलभुत गरजांपासून वंचित आहेत. येथील कार्यकर्ते जैतू पारधी यांनी आसल ग्रामपंचायतमधील आदिवासी बांधवांना वीज पुरवठा व्हावा,म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांसह धावपळ सुरु केली आणि त्यानंतर वन विभागाने दिलेली परवानगी आणि माथेरान पर्यावरण संरक्षण समितीने दिलेली ना-हरकत यामुळे आसलवाडी, नाण्याचामाळ, मण्याचामाळ आणि सागाचीवाडी मध्ये वीज पुरवठा करण्याबाबत अडचण दूर झाली होती, मात्र त्यासाठी आवश्यक निधी कोणी देण्यास तयार नव्हते. पुढे आमदार सुरेश लाड यांनी जिल्हा नियोजन विभागातून तब्बल ३४ लाखाचा निधी मंजूर करून पुढाकार घेतला . त्यानंतर बेकरेवाडीमधून आसलवाडी, नाण्याचा माळ आणि मण्याचामाळ धनगरवाडा येथील वस्तीला वीज पुरवठा करण्याची कार्यवाही सुरु झाली.

Web Title: Tribal wade will be bright!