मुंबई : विद्याविहार रेल्वेस्थानकाचा पूर्व आणि पश्चिम भाग जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या पोचरस्त्याचे बांधकाम सध्या सुरू असून, त्यामुळे बाधित होणाऱ्या २१३ झाडांच्या बदल्यात महापालिका २,२७८ झाडे पनवेल परिसरातील करंजा येथील दोन हेक्टर जागेवर लावणार आहे. मुंबईत झाडे लावण्यासाठी महापालिकेकडे जागा उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील झाडे तोडल्याने पर्यावरणाचे होणारे नुकसान पनवेलला झाडे लावून कसे भरून निघणार, याविषयी आता नागरिक व पर्यावरणप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
या उड्डाणपुलाच्या पोचरस्त्यासाठी बाधित होणाऱ्या २१३ झाडांपैकी ७७ झाडे कापली जाणार असून ७३ झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. उर्वरित झाडांबाबत परिस्थितीनुसार
निर्णय घेण्यात येईल. सध्या बाधित
होणाऱ्या झाडांच्या बदल्यात महापालिका २,२७८ झाडे पनवेल परिसरात लावणार असून त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्च येणार आहे. नवी झाडे लावण्याची जबाबदारी महापालिकेने महाराष्ट्र वन विकास महामंडळावर सोपविली आहे.
या उड्डाणपुलाचे काम जून २०२६ मध्ये पूर्ण करण्यावर पालिकेचा भर आहे. त्यानंतर वाहनचालक व नागरिकांना पूर्व-पश्चिम येजा करणे अधिक सोयीचे होणार आहे.
उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर
विद्याविहार स्थानकावर एल. बी. एस. मार्ग आणि आर.सी. मार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या या प्रकल्पासाठी ए.बी. इंफ्राबिल्ड लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी ७६.१८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी फेब्रुवारी २०१४ मध्ये कार्यादेश देण्यात आला असून, उड्डाणपूल उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
पालिकेच्या उद्यान विभागाच्या परवानगीनुसार झाडे तोडली जातील व पुनर्रोपण केले जाईल, मात्र ५२ झाडांना कोणतीही हानी पोहोचविली जाणार नाही. तोडावयाच्या झाडांच्या बदल्यात नवे १,९९० वृक्ष लावण्याची अट घालण्यात आली होती.
पुलाचे काम जूनअखेरीस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
उड्डाणपुलाचे काम जून २०२६ अखेर पर्यंत करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे. पावसाळा लक्षात घेता पुलाची शिल्लक कामे ३१ मे पूर्वी मार्गी लावावीत, असे निर्देश पालिका प्रशासनाने कंत्राटदाराला दिले आहेत.
वन विकास महामंडळाकडे महापालिकेने मागितली जागा
वृक्षलागवडीसाठी महापालिकेकडे जागा नसल्याने पालिकेने वन विकास महामंडळाकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. महामंडळाने पनवेल परिसरातील कारंजा येथील २.०५ हेक्टर जागा निश्चित केली आहे.
रस्त्याच्या आराखड्यानुसार आणखी २४ वृक्ष बाधित होणार असून त्यापैकी १२ वृक्ष तोडावे लागतील आणि १२ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येईल. त्यामुळे एकूण २,२७८ नवी झाडे लावण्यात येणार आहेत.
वृक्ष पुनर्रोपण, नवी लागवड आणि पुढील सात वर्षे त्यांची देखभाल यासाठी १.५७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आधीच्या अंदाजानुसार ७३ वृक्षांच्या पुनर्रोपणासाठी सुमारे ४१.५१ लाख रुपये असे मिळून सुमारे दोन कोटी एकूण खर्च आहे.
Web Summary : 213 trees from Vidya Vihar, Mumbai will be cut for flyover construction. In return, 2,278 trees will be planted in Karanja, Panvel due to space constraints in Mumbai. The project costs ₹2 crore and will be completed by June 2026.
Web Summary : मुंबई के विद्या विहार से 213 पेड़ फ्लाईओवर निर्माण के लिए काटे जाएंगे। बदले में, मुंबई में जगह की कमी के कारण करंजा, पनवेल में 2,278 पेड़ लगाए जाएंगे। परियोजना की लागत ₹2 करोड़ है और यह जून 2026 तक पूरी हो जाएगी।