वृक्षलागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी - मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:07 AM2021-01-23T04:07:02+5:302021-01-23T04:07:02+5:30

वृक्षलागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी मुख्यमंत्री : विकास खारगे लिखित पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन लोकमत न्यूज ...

Tree planting is not a hobby but a necessity - CM | वृक्षलागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी - मुख्यमंत्री

वृक्षलागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी - मुख्यमंत्री

Next

वृक्षलागवड आवड म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी

मुख्यमंत्री : विकास खारगे लिखित पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वृक्षलागवड ही आवड किंवा छंद म्हणून नव्हे तर गरज म्हणून हवी, असे मत व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात वृक्षलागवडीची मोठी मोहीम सुरू करण्याचे सूतोवाच केले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी लिहिलेल्या ‘एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना त्यांनी हे मत मांडले.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील समिती कक्षात विकास खारगे यांनी लिहिलेल्या ‘एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग’ या पुस्तकाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीष सिंग, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जराड, खारगे यांची पत्नी मीनाक्षी खारगे, मुले व्यंकटेश आणि मनीष खारगे, वनविभागातील अधिकारी अरविंद आपटे आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक तापमानवाढ आणि प्रदूषण रोखण्यासाठी वृक्षलागवड महत्त्वाची आहे. खारगे यांचे पुस्तक हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. कोरोनाने आपल्याला त्याचे परिणाम- दुष्परिणाम दाखवले, पण, काही चांगल्या गोष्टीही दाखवल्या. या काळात प्रदूषण कमी झाल्याने मोर रस्त्यावर नाचल्याचे आपण सर्वांनी पाहिले. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्याचा प्रयत्न करताना वनवैभव जपायचे आणि वाढवायचे आहे. जिथे आपण झाड लावू शकतो म्हणजे जिथे जागा आणि पाणी आहे, तिथे वृक्षलागवड झाली पाहिजे. पाण्याच्या टाक्या करून डोंगरउतारावर पळस-पंगारासारखी नयन मनोहारी झाडे लावून एक सुंदर व्हॅली निर्माण केली पाहिजे. यासाठी डोंगरावर जलसंधारणाची कामे हाती घेणे, वृक्षलागवडीची मोहीम जोमाने पुढे नेण्याची गरज आहे. असे झाले तर डोंगरावर हिरवा शालू आपण निर्माण करू शकू, असा‍ विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विकास खारगे यांनी ते वनविभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत असताना केलेल्या महावृक्षलागवडीचा अनुभव आणि हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली. राज्याचे सध्याचे वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी अंदाजे ४०० कोटी वृक्ष लावणे आणि ते जगवणे आवश्यक आहे. त्यामुळे वनविभागाने व्यापक लोकसहभागातून वृक्षलागवडीचा महाप्रयोग हाती घेतला होता. त्यासाठी ६५ लाखांची हरित सेना निर्माण केली. कन्या वनसमृद्धी योजनेतून मुलीच्या जन्माचे स्वागत करताना १० वृक्ष लावण्याचा संस्कार रुजवला. रानमळा पॅटर्नमधून जन्मवृक्ष, शुभमंगल वृक्ष, स्मृती वृक्ष अशा पद्धतीने जीवनातील प्रत्येक सुखदु:खाचा प्रसंग आणि त्या आठवणी वृक्ष लावून जपण्याचे आवाहन करण्यात आले. यात राज्य आणि केंद्र शासनाचे विविध विभाग, सामाजिक, स्वयंसेवी, आध्यात्मिक संस्था, सिनेक्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी अशा सर्वांचा सहभाग होता. काटेकोर नियोजन, पूर्वतयारी करत हरित महाराष्ट्राची ही चळवळ लोकचळवळीत रूपांतरित करण्यात यश मिळाल्याचे व भारतीय वनसर्वेक्षण अहवालातून या वृक्षलागवडीच्या फलनिष्पत्तीचे निष्कर्ष दिसून आल्याचेही ते म्हणाले.

* फोटो ओळ

‘एक हरित चळवळ, वृक्षलागवडीचा महाप्रयोग’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून वनविभागाचे अधिकारी अरविंद आपटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जराड, खासदार विनायक राऊत, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुस्तकाचे लेखक आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, त्यांची पत्नी मीनाक्षी, मुले व्यंकटेश आणि मनीष, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीष सिंग.

...................................

Web Title: Tree planting is not a hobby but a necessity - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.