मुंबई : मुलुंडमध्ये वसंत ऑस्कर परिसरात महिनाभरापूर्वी रस्त्याच्या कामादरम्यान जुने झाड मुळासकट उखडून खाली कोसळले होते. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नसले तरी आजूबाजूच्या आणखी दोन ते तीन झाडांनाही त्याचा फटका बसला होता. या प्रकरणांकडे रस्ते विभागाकडून कानाडोळा होत असताना, वृक्ष प्राधिकरणाने ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
या परिसरात नवदीप कंत्राटदारामार्फत रस्त्याचे काम सुरू होते; मात्र त्यावेळी योग्य काळजी न घेतल्यामुळे रस्त्याजवळील जुन्या झाडांना त्याचा फटका बसला. त्यावेळी एक झाड मुळासहित कोसळण्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता; मात्र त्यानंतरही रस्ते विभागाकडून संबंधित कंत्राटदारावर कारवाईसाठी टाळाटाळ झाली.
याबाबत वृक्ष विभागाने पत्रव्यवहार केला असता त्यावर कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याबाबत रस्ते विभागाचे पिंगळे यांच्याशी अनेकदा संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
झाड कोसळल्यानंतर पालिकेकडे लेखी तक्रार देण्यात आली. मात्र, तत्काळ कारवाई झाली नाही. पुढेही प्रशासन नेमके काय कारवाई करते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एक झाड कोसळले, म्हणून काय झाले अशीच प्रशासनाची भूमिका दिसते आहे.गजेंद्र पिपाडा, तक्रारदार
कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वृक्ष विभागाचे संदीप राऊत यांनी सांगितले.