खाकी वर्दीचा धाकच प्रवाशांना नाही
By Admin | Updated: November 25, 2015 01:43 IST2015-11-25T01:43:22+5:302015-11-25T01:43:22+5:30
शहापूर तालुक्याला शहरीकरणाशी जोडणाऱ्या आसनगाव स्थानकातून गेल्या काही वर्षांपासून २० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

खाकी वर्दीचा धाकच प्रवाशांना नाही
अनिकेत घमंडी, डोंबिवली
शहापूर तालुक्याला शहरीकरणाशी जोडणाऱ्या आसनगाव स्थानकातून गेल्या काही वर्षांपासून २० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. येथील विविध शिक्षणसंस्थांमध्ये येणारे विद्यार्थी सर्रास रेल्वे मार्ग ओलांडतात. त्यांना खाकी वर्दीचा कुठलाही धाक नसल्याचे दिसते.
प्रतीदिन ३लाख रुपये यानुसार महिना ९० लाख ते १ करोड रुपयांची उलाढाल येथे तिकीट विक्रीच्या माध्यमातून होते. मात्र त्या तुलनेत या स्थानकात सुविधा नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत. येथे अवघे दोन फलाट आहेत. मुंबई विभागात सर्वत्र पेव्हर ब्लॉक आणि कोटा पद्धतीच्या लाद्या बसवण्यात आलेल्या असतांनाच या ठिकाणच्या फलाटामध्ये मात्र जुन्या जीर्ण झालेल्या शहाबादी फरशांसह जुने पंखे, ट्युबलाईट आणि मोडकळीस आलेली बाकडी अशा भयंकर स्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. आसनगाव हे ठाणे जिल्ह्यात एज्युकेशन हब होत असतांनाच या स्थानकाचा विकास मात्र खुंटलेलाच आहे. येथील विविध शिक्षण संस्थांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनमानीपुढे खाकीवर्दीचा धाक नसल्याचे स्पष्ट होते. तरुणाई सुरक्षा रक्षकांसमोर जीव धोक्यात घालून ट्रॅक ओलांडते.
या ठिकाणी अशा बेपर्वाईमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत, मात्र तरीही त्यांच्या मनमानीवर चाप लावत नाही. दिवसाला २० हजारांहून अधिक प्रवाशांसाठी येथे मुलभूत सुविधांची वानवा आहे. अवघे एक स्वच्छतागृह असून तेथे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय नाही, त्यातच ज्या मुताऱ्या आहेत त्या अस्वच्छ असल्याने अनेकांची कुचंबणा होते. अवघे एक उपाहारगृह व पाणपोई असून तेथेही अस्वच्छता आहे. अनेक प्रवासी याच स्थानकातून नाशिक हायवेला जाण्यासाठी ट्रॅकमधून पायी जाऊन एका उड्डाणपूलाच्या ठिकाणी जातात, आणि मार्गस्थ होतात. काही नागरिक तेथूनच स्थानकात येतात. अशा प्रयत्नातही अनेकदा अपघात झाल्याच्या घटना आहेत. त्यास आळा घालण्यासाठी संरक्षक भिंत या ठिकाणी बांधण्यात यावी, डिव्हायडर (लोखंडी जाळया) बसवण्यात याव्यात यासाठी स्थानक सुधारणा समितीवर असलेले जगदीश धनगर यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांसमवेत होणाऱ्या बैठकांमध्ये आवाज उठवला . परंतु देखल्या देवा दंडवतासारखी कारवाई होते, प्रभावी आणि कायमस्वरुपी उपाययोजना मात्र केलेली नाही.
आसनगाव स्थानकादरम्यान बऱ्याचदा मालगाडीचे इंजिन फेल होते, अन् म.रे चा टिटवाळा-कसारा मार्ग ठप्प होतो. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणारे हजारो प्रवासी लोकलमध्ये ताटकळल्याने त्यांचे प्रचंड हाल होतात. या तांत्रिक बिघाडामुळे आधीच नको असलेला प्रवास अधिक कंटाळवाणा, होतो. रेल्वेखेरीज अन्य पर्यायच नसल्याने तांत्रिक समस्येने सर्वाधिक प्रमाणात येथील चाकरमान्यांचे हाल होतात. अनेकांना लेटमार्कसह दांडी ला सामोरे जावे लागते.
- अनिता झोपे, अध्यक्षा, केकेआरपीए
येथून स.८.२८ ला सीएसटीला धावणारी लोकल रोज किमान १०-१५ मिनिटे उशिराने सुटते. या गाडीची वेळ झाली तरीही मेलगाड्या आधी सोडण्यात येतात. त्यामुळे शेकडो प्रवाशांच्या नियोजनावर पाणी फिरते.येथून पहाटे ५.३० व स. ८.४५ ला कल्याणसाठी लोकल धावते ती ठाण्यापर्यंत वाढवावी. तसेच ठाणे -कसारा मार्गावर अथवा कल्याण-कसारा मार्गावर शटल सर्व्हीस उपलब्ध कराव्यात.
- जितेंद्र विशे, स्थापत्य
अभियंता व सचिव उपनगरीय रेल्वे
प्रवासी एकता संस्था.
मध्य रेल्वेच्या तत्कालीन महाव्यवस्थापक सौम्या राघवन यांनी येथील होम प्लॅटफॉर्म बंद केला, त्या ट्रॅकवर बगीचा फुलवला, आता त्यास चार वर्षाहून अधिक काळ झाला. मात्र आता तेथे ना बगीचा आहे ना होम प्लॅटफॉर्म. तेथे ही सुविधा सुरु करावी, आणि त्या फलाटातून आसनगाव - सीएसटी गाड्या सुटल्यास अपघात कमी होतील. कल्याण-कसारा रेल्वे पॅसेंजर असो.च्या वतीने यासंदर्भात अनेकदा पत्रव्यवहार झाला, परंतु त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.