प्रवासी कट्टा - जीपीएस लावाल; पण मनोवृत्तीचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 05:58 IST2018-10-04T05:58:17+5:302018-10-04T05:58:41+5:30
रिक्षा हे सर्वसामान्यांचे मुख्य प्रवासी साधन

प्रवासी कट्टा - जीपीएस लावाल; पण मनोवृत्तीचे काय?
रिक्षा ही सामान्य नागरिकांच्या दळण-वळणासाठीचे प्रमुख साधन आहे. सर्वसामान्यांच्या सोई व सुविधांसाठी रिक्षा असून, हे मुजोर रिक्षाचालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व रिक्षांमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यरत करणे आवश्यकच नसून अनिवार्य आहे. रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषत: तरुणी आणि महिलावर्गाला सुरक्षित प्रवासाचा विश्वास देण्यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यरत करणे आवश्यक आहे.
- रशिद युसूफ पटवेकर, बेलापूर
जीपीएससह कॅमेरे कार्यरत करा
रिक्षांमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यरत केल्यास गुन्हा घडल्यावर रिक्षाचा ठावठिकाणा त्वरित समजण्यास मदत होईल. तथापि, त्या रिक्षात त्या वेळी कोण चालक होता? प्रवासी कोण होता? याचा बोध होत नाही. त्यासाठी भारत सरकारने प्रवासी वाहतूक करणाºया चालकासमोर व प्रवाशासमोर कॅमेरे लावणे बंधनकारक करावे, त्यामुळे गुन्हेगाराची ओळख होईल व घटनेचा खरे-खोटेपणा तपासता येईल व संबंधितांना त्वरित न्याय मिळून न्यायप्रक्रिया जलद होईल. भारतातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रवासी वाहनाला जीपीएस, चालकाची व प्रवाशांची ओळख पटविणारा कॅमेरा असल्याशिवाय वाहनाला परवानगी देऊ नये, तसेच ती साधने चालू असल्याशिवाय वाहन चालू होऊ नये, अशी अत्याधुनिक सेंसरयुक्त यंत्रणा असणे आवश्यक आहे. एखादा रिक्षाचालक रिक्षा (कोणतेही प्रवासी वाहन) चालविण्याची रात्री १२ वाजल्यापासून दिवसभर कधीही सुरुवात करीत असेल, तर त्याने प्रथम आरटीओमधील नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आपला परवाना क्रमांक नोंदवून व्यवसाय करण्यास सुरुवात करणे, अशी नियमावली करणे आवश्यक आहे.
- गणेश पद्माकर पाटील, ठाणे
न्यायालयाचे आदेश सामान्यांच्या हिताचे
आॅटो रिक्षाचालकांच्या गुन्हेगारी वर्तनापासून प्रवाशांचा बचाव व्हावा, म्हणून राज्यातील सर्व रिक्षांना येत्या सहा महिन्यांत जीपीएस यंत्रणा लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. यातून रिक्षांचा माग काढणे, त्यांचा शोध घेणे, अशा रिक्षाचालकांवर कारवाई करणे सोपे होणार आहे, त्यामुळे न्यायालयाचा हा आदेश सर्वसामान्य प्रवाशांच्या हिताचा आहे. - अमेय गिरधर, नालासोपारा
रिक्षाचालकांच्या विकृतीचे काय?
रिक्षांमध्ये होणारे विनयभंग, बलात्कार यांसारख्या प्रकारांना रोखण्यासाठी आणि दोषी रिक्षाचालकांना बेड्या ठोकण्यासाठी रिक्षांमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यरत करण्यात येणार आहे. बलात्कार, विनयभंग हे प्रकार का घडतात, याचा मूळ विचार करणे गरजेचे आहे. पुरुषांचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन
हा महत्त्वाचा आहे. हे सर्व प्रकार म्हणजे मानसिक विकृतीचा एक भाग आहे. आईवडिलांचे संस्कार, योग्य मार्गदर्शन याचा अभाव असल्यामुळेच असे
प्रकार घडतात. वास्तविक जोपर्यंत ही मानसिक विकृती सुधारत नाही,
तोपर्यंत जीपीएस यंत्रणा लावून काहीही उपयोग होणार नाही.
- अरुण खटावकर, लालबाग