प्रतिक्षा यादीत अडकलात तर विमानाने प्रवास करा
By Admin | Updated: May 15, 2015 00:45 IST2015-05-15T00:45:24+5:302015-05-15T00:45:24+5:30
मेल-एक्सप्रेस ट्रेनचे तिकिट काढल्यानंतर प्रतिक्षा यादीत (वेटिंग लिस्ट) नाव येणाऱ्या प्रवाशांना आयआरसीटीसीकडून दिलासा देण्यात येणार आहे

प्रतिक्षा यादीत अडकलात तर विमानाने प्रवास करा
मुंबई : मेल-एक्सप्रेस ट्रेनचे तिकिट काढल्यानंतर प्रतिक्षा यादीत (वेटिंग लिस्ट) नाव येणाऱ्या प्रवाशांना आयआरसीटीसीकडून दिलासा देण्यात येणार आहे. प्रतिक्षा यादीत आलेल्या आणि त्यानंतर अतिंम यादीत नाव नसलेल्या प्रवाशांसमोर आयआरसीटीसीने विमान प्रवासाचा पर्याय ठेवला आहे. आयआरसीटीसीकडून एक मॅसेज प्रवाशांच्या मोबाईलवर पाठविला जाणार असून त्याव्दारे एका संकेतस्थळावर जावून प्रवासी विमानाची तिकिट आरक्षित करु शकणार आहे. या प्रवासावर आयआरसीटीसीकडून ४0 ते ५0 टक्के सूट देण्यात येणार असल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ही सेवा नुकतीच सुरु करण्यात आली आहे.
रेल्वेची तिकिटे मिळविताना प्रवाशांच्या नेहमीच नाकेनऊ येतात. आॅॅनलाईन असो वा पीआरएस असो प्रवाशांना मोठ्या प्रतिक्षा यादीला सामोरे जावे लागतेच. तिकिट काढतानाच प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांतच प्रतिक्षा यादीला सामोरे जावे लागत आहे.
प्रतिक्षा यादी कमी व्हावी, दलालांची दलाली कमी व्हावी आणि प्रवाशांना कन्फर्म तिकिट मिळावे यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून वेळोवेळी बदल करण्यात आले. चार महिने आधी आरक्षण करण्याचा नवा निर्णयही घेण्यात आला. मात्र प्रवाशांना प्रतिक्षा यादी मिळतच आहे. या यादीत नाव येणाऱ्या प्रवाशांना आयआरसीटीसीकडून दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रतिक्षा यादीत नाव आल्यावर आणि त्यानंतर अंतिम यादीत नाव न आलेल्या प्रवाशांसमोर हवाई वाहतुकीचा पर्याय ठेवण्यात आला आहे. ज्या प्रवाशांना एखाद्या ठिकाणी जाणे महत्वाचे आहे असे प्रवासी हवाई मार्ग अवलंबवू शकतात, असे आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. अंतिम यादी तयार झाल्यावर प्रतिक्षा यादीतील सर्व तिकिटे रद्द होतात आणि अशावेळी तीन दिवस आधी तिकिट काढलेल्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज येईल. या मॅसेजमध्ये अंतिम यादीत नाव न आलेला प्रवासी विमान प्रवासासाठी पात्र असून त्यांनी www.air.irctc.co.in या संकेतस्थळावर जावून माहीती घेण्याचे आवाहन केले जाईल. प्रवाशाला हवाई प्रवास पाहिजे असल्यास त्याला त्यात ४0 ते ५0 टक्के सूट देण्यात येईल. हवाई कंपन्या देत असलेल्या शहरादरम्यानच सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)