मुंबई : परिवहनमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर शालेय बस आणि आंतरशहरी बस वाहतूकबाबतच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र ट्रक, टेम्पो आणि कंटेनरसारख्या अवजड माल वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने मालवाहतूकदारांचा संप सुरूच राहणार आहे, अशी माहिती राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली. वाहतूकदारांच्या संपाचा भाजीपाला व इतर पुरवठ्यावर पहिल्या दिवशी कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
विधानमंडळ समिती कक्षामध्ये परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक झाली. यावेळी गृह राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि ४१ मालवाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील ७० टक्के वाहने पहिल्या दिवशी संपात सहभागी झाले होते, असे शिंदे म्हणाले.
बुधवारी माल पोहोचविण्यासाठी निघालेल्या काही गाड्या रस्त्यावर धावत होत्या. राज्यात सुमारे सहा लाख अवजड वाहने असून, त्यातील सुमारे ७० टक्के वाहने संपात सहभागी झाली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. न्हावाशेवासह पोर्ट ट्रस्ट परिसरात असलेल्या वाहनतळावर मालवाहने उभी होती, असेही ते म्हणाले.
वाहतूकदारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक : सरनाईक
वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इतर विविध वाहतूक संघटनांनादेखील स्वतंत्रपणे चर्चेसाठी वेळ देता येईल. उपोषण व संप करू नये, असे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील वाहतूकदारांच्या बाजूने निर्णय घेण्यात येईल, असे सांगितल्याचे सरनाईक म्हणाले.
शहरांमध्ये पार्किंग जागा निर्माण करणे, यातून विशेषतः मुंबई शहरातील खासगी प्रवासी बसेस, स्कूल व्हॅन, मालट्रक, टँकर आधी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होईल. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलिस आणि परिवहन विभागाला सरनाईक यांनी बैठकीत सूचना दिल्या. ई- चलानबाबत तक्रारींची दखल घेऊन पोलिस विभागासही सूचना देण्यात आल्या.