पारदर्शकता सोयीची नसावी!
By Admin | Updated: February 15, 2017 05:08 IST2017-02-15T05:08:54+5:302017-02-15T05:08:54+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पारदर्शकतेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मात्र हीच पारदर्शकता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने

पारदर्शकता सोयीची नसावी!
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पारदर्शकतेचा मुद्दा चांगलाच गाजतोय. मात्र हीच पारदर्शकता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने महापालिकेच्या संकेतस्थळाबाबतही दाखवावी, अशी मागणी मराठी अभ्यास केंद्राने केली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत अभ्यास केंद्राने १५ नगरसेवकांचे कार्य मूल्यमापन अहवालाचे प्रकाशन केले.
या वेळी प्रकल्प समन्वयक आनंद भंडारे म्हणाले की, पारदर्शकतेवर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांनी प्रशासन म्हणून संपूर्ण पारदर्शकता राखावी. त्यासाठी महापालिकेने प्रत्येक प्रभागासाठी किती निधी दिला? त्यातला किती खर्च झाला आणि न वापरलेला निधी किती, याची प्रभागनिहाय माहिती संकेतस्थळावर द्यावी. शिवाय महापालिका व विभाग पातळीवरच्या वेगवेगळ्या समिती व सभा यांना उपस्थित असलेल्या नगरसेवकांच्या उपस्थितीच्या नोंदीही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा. ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नगरसेवकांचे हजेरीपत्रक अपलोड केले जाते. त्यामुळे मुंबई मनपाने पुढाकार घेऊन ही सर्व माहिती चिटणीस विभागापुरती मर्यादित न ठेवता सर्वसामान्यांसाठी खुली करण्याचे आवाहन भंडारे यांनी केले.
मराठी अभ्यास केंद्राने तयार केलेल्या अहवालांत नगरसेवकांच्या उपस्थितीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. याशिवाय काही ठरावीक कंत्राटदारांनाच बाजू-बाजूच्या प्रभागांत सर्वाधिक कामे दिल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या प्रकरणात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय अभ्यास केंद्राने व्यक्त केला आहे. याशिवाय कंत्राटदार, नगरसेवक आणि अधिकारी यांतील संबंधही यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप अभ्यास केंद्राने केला आहे. (प्रतिनिधी)