महापालिकेत बदल्यांचे सत्र

By Admin | Updated: May 28, 2014 00:58 IST2014-05-28T00:58:13+5:302014-05-28T00:58:13+5:30

महापालिका प्रशासनाने २५० कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत.

Transfers Session in Municipal Corporation | महापालिकेत बदल्यांचे सत्र

महापालिकेत बदल्यांचे सत्र

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने २५० कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असणार्‍या काही कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी अजूनही अनेक चिकटू कर्मचार्‍यांना अभय मिळाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बदल्यांच्या घोळाविषयी प्रामाणिक कर्मचार्‍यांमध्ये नेहमीच असंतोष निर्माण होत असतो. उपकर, मालमत्ता, अभियांत्रिकी, आरोग्य व इतर अनेक विभागांमध्ये वर्षानुवर्षे कर्मचारी व अधिकारी एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. प्रत्येक विभागांमध्ये ठरावीक कर्मचार्‍यांची मक्तेदारी तयार झाली आहे. याविषयी लोकमतने वारंवार आवाज उठविला होता. यानंतर आयुक्त व प्रशासन उपआयुक्तांनीही निवडणुका झाल्यानंतर बदल्या करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. सोमवारी विविध विभागांमधील २५० कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपकर विभागामधील महत्त्वाच्या पाच जणांच्या बदल्या केल्या आहेत. अभियांत्रिकी, लेखा, उपकर, मालमत्ता व इतर विभागांमधील कर्मचार्‍यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. परंतु ४ ते ८ वर्षे एकाच ठिकाणी काम करणार्‍या अनेकांना अभय मिळाले आहे. आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या शिल्लक असून त्याही लवकरच करण्यात येणार आहेत. प्रशासन उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, बदल्यांसाठी कमिटी स्थापन केली होती. पारदर्शीपणे व नियमानुसार बदल्या करण्यात आल्या असून अजूनही काही कर्मचार्‍यांच्या बदल्या लवकरच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Transfers Session in Municipal Corporation