Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा विरुद्ध पालिका; ५६ वसाहतींमधील सेवा वाहिन्यांचे हस्तांतरण रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 10:13 IST

मुंबईतील म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील सेवा-सुविधांचे जाळे मुंबई महापालिकेकडे अद्याप हस्तांतरित झाले नाहीत.

मुंबई :मुंबईतीलम्हाडाच्या ५६ वसाहतींमधील सेवा-सुविधांचे जाळे मुंबई महापालिकेकडे अद्याप हस्तांतरित न झाल्याने सेवा वाहिन्यांची देखभाल आणि दुरुस्ती, यासाठी या वसाहतीतील रहिवाशांना या दोन्ही यंत्रणांकडे खेटे घालावे लागत आहेत. काही वेळेस दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण होतो.

सेवा वाहिन्यांचे जाळे पालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत मध्यंतरी हालचाली सुरू होत्या. मात्र, पुढे काही घडले नाही. या वसाहतींमधील सेवा वाहिन्यांच्या देखभालीसाठी म्हाडाला पालिकेला मोठ्या प्रमाणावर पैसे द्यावे लागणार आहेत, या मुद्द्यावर अडल्याचे समजते. जलवाहिनी दुरुस्ती, जलवाहिनी फुटणे, अशी काही कामे निघाल्यास काही वेळेस म्हाडा पालिकेकडे बोट दाखवते, तर म्हाडा ही जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगते. विक्रोळीत सध्या दूषित पाण्याचे प्रकरण चर्चेत आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे मलनिःसारण वाहिन्यांतील पाणी जलवाहिनीत मिसळल्याने दूषित पाण्याची समस्या जाणवत आहे. सध्या पालिका दुरुस्तीचे काम करीत आहे. 

दुरुस्तीचे काम सुरू -

१) विक्रोळीत दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पालिकेने दखल घेतली. गुरुवारपासून पालिका दुरुस्तीचे काम करीत आहे. तत्पूर्वी पालिकेने हे काम करण्यास म्हाडाला सांगितले होते. मात्र, म्हाडाने तातडीने दखल न घेतल्यामुळे आम्हीच हे काम हाती घेतले, असेही पालिकेने स्पष्ट केले होते. अशाप्रकारे या दोन्ही यंत्रणांमध्ये वाद सुरू असतो. त्यामुळे लवकरात लवकर सेवा वाहिन्यांचे हस्तांतरण पालिकेकडे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

२)  यासंदर्भात नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केली असता, हे काम म्हाडाच्या अखत्यारित असल्याचे उत्तर देण्यात आले. तर म्हाडाकडे तक्रार केली असता, पालिकेकडून तुमच्या इमारतीला ज्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा होतो, ती तपासून घ्या, असे सांगण्यात आले.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाम्हाडा