मुंबई : व्हॉट्सॲप संदेशाद्वारे कंपनीची तब्बल तीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नाहूर परिसरात घडली आहे. कंपनीचा संचालक समजून भामट्याच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाहूर पूर्वेकडील जीवन विहार को-ऑप. हौसिंग सोसायटीत राहणारे अजित चव्हाण (५२) हे काळाचौकी येथील एका कंपनीत वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीचे खाते नरिमन पॉइंट शाखेत असून, संबंधित आर्थिक व्यवहारांची जबाबदारी चव्हाण यांच्याकडे आहे. २४ जानेवारी २०२६ ला सायंकाळी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कंपनीचा संचालक असल्याचे सांगून एकाने संदेश पाठवला. त्याने संचालक असल्याचे सांगून मोबाइल नंबर सेव्ह करायला सांगितला.
तातडीने पैसे पाठवण्याची सूचना
२७ जानेवारीला सकाळी पुन्हा संदेश पाठवून ‘मी मीटिंगमध्ये आहे, फक्त मेसेजला उत्तर द्या,’ असे सांगितले.
यानंतर संबंधित व्यक्तीने एका बँक खात्यावर तीन लाख रुपये तातडीने पाठविण्याच्या सूचना दिल्या.
संचालकांचा संदेश असल्याचा समज करून चव्हाण यांनी कंपनीच्या खात्यातून तीन लाख रुपये वर्ग केले, असे तक्रारीत नमूद आहे.
कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाने मूळ संचालकांच्या अधिकृत क्रमांकावर व्यवहाराची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संचालकांनी अशा कोणत्याही व्यवहाराच्या सूचना दिल्या नसल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर संबंधित अनोळखी क्रमांकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. या प्रकारानंतर चव्हाण यांनी तत्काळ राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार दाखल केली.
अनोळखी मोबाइलधारकाने कंपनीच्या संचालकाचे नाव वापरून बनावट ओळख निर्माण करत आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून मोबाइल क्रमांक व संबंधित बँक खात्याचा तपास सुरू आहे.
Web Summary : Mumbai company defrauded of ₹3 lakh via WhatsApp. Imposter posing as director instructed senior accountant to transfer funds. The fraud was discovered after verification with the actual director. Police are investigating the cybercrime.
Web Summary : मुंबई में व्हाट्सएप के माध्यम से एक कंपनी को ₹3 लाख का चूना लगा। धोखेबाज ने निर्देशक बनकर वरिष्ठ लेखाकार को धन हस्तांतरित करने का निर्देश दिया। असली निर्देशक से सत्यापन के बाद धोखाधड़ी का पता चला। पुलिस साइबर अपराध की जांच कर रही है।