Join us  

बाजार समित्यांचे व्यवहार हाेणार ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 7:19 AM

केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये शेतकरी, कामगार संघटनांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आदी राजकीय पक्षही सहभागी होणार आहेत.

मुंबई : केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये शेतकरी, कामगार संघटनांसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आदी राजकीय पक्षही सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मंगळवारी राळेगण सिद्धी येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. शेतकरी संघटनांनी दूध, फळे आणि भाजीपाल्याच्या सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मुंबईतील बेस्ट, लोकल, टॅक्सी सेवा सुरू राहणार आहेत. एसटी सेवाही सुरू राहणार असली तरी बंदमुळे एसटीचे नुकसान होऊ नये यासाठी काही भागात एसटी सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व बाजार समित्याही भारत बंदमध्ये सहभागी होणार असल्याने या समित्यांमधील व्यवहार ठप्प होणार आहेत. पूना डिस्ट्रिक्ट मोटार गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशननेही आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलनाला नांदेडच्या गुरुद्वारा सचखंड बोर्डानेही पाठिंबा दिला असून, दिल्लीच्या लंगरसाठी मंगळवारी गुरुद्वारा बोर्डाची ५० जणांची टीम दिल्लीला रवाना होणार आहे. लातूरमध्ये किसान समन्वय समिती व काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तर औरंगाबादमध्ये सोमवारी शहर युवक काँग्रेसतर्फे क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली. परभणीतही एकता हमाल मजदूर युनियनने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन बंदला पाठिंबा दिला. धुळ्यात महाविकास आघाडीतर्फे देवभाने - कापडणे आणि पारोळा रोडवर चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आले. बंदोबस्तात वाढ या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस बंदोबस्तात वाढविला आहे. ६०० पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. शिवाय राज्य राखीव पोलिस दलाच्या ९ तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.  

संघप्रणीत किसान संघाचा ‘यू टर्न’  राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भारतीय किसान संघानेही आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता किसान संघाने शेतकरी आंदोलन व ‘भारत बंद’विरोधात भूमिका घेतली आहे.  या आंदोलनात राष्ट्रविरोधी तत्व शिरल्याचा आरोप करीत संघटनेने बंदमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.  

टॅग्स :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमहाराष्ट्र