Join us  

प्रशिक्षित चालकांना चाचणीविना मिळणार वाहन परवाना, रस्ते वाहतूक मंत्रालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 2:44 AM

Trained drivers will get driving license without testing : या नवीन केंद्रात प्रशिक्षित चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहन चाचणी न देताच थेट वाहनपरवाना (अनुज्ञप्ती) मिळेल.

मुंबई : रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच मसुदा अधिसूचना काढली आहे. त्यानुसार नवीन वाहन प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाईल. या नवीन केंद्रात प्रशिक्षित चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहन चाचणी न देताच थेट वाहनपरवाना (अनुज्ञप्ती) मिळेल.परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, नव्याने वाहन प्रशिक्षण केंद्रासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने मसुदा अधिसूचना जारी केली आहे. याविषयी काही बदल हवे असल्यास प्रत्येक राज्याला ३० दिवसांत सूचना सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, राज्य शासन याबाबत निर्णय घेईल.केंद्राच्या अधिसूचनेनुसार वाहन प्रशिक्षण केंद्र हे मैदानी परिसरात साधारण एक किंवा दोन एकर जागेत हवे. यामध्ये प्रथम वाहतूक नियम शिकवण्याची साधने आवश्यक आहेत. संगणक, मल्टिमीडिया प्रोजेक्टर, अवजड आणि हलकी वाहने, आभासी प्रशिक्षण चाचणी यंत्रणा, स्वतंत्र वाहन चाचणी पथ, पार्किंग व्यवस्था इत्यादी सुविधा या केंद्रात असणे गरजेचे आहे. त्याची पूर्तता करणाऱ्या कंपनी आणि कंत्राटदारालाच केंद्राकडून मान्यता मिळेल. या प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या चालकाला आरटीओत पुन्हा चाचणी देण्याची गरज नाही. त्याला थेट वाहनपरवाना मिळेल.

सध्या असा मिळतो शिकाऊ वाहन परवानाराज्यात शासन मान्यतेनुसार खासगी वाहन प्रशिक्षण केंद्र असून, यामध्ये चालकाला २१ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. यातून बाहेर पडलेला चालक आरटीओत प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र सादर करतो. त्यानंतर सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर आरटीओकडून त्याची चाचणी घेतली जाते आणि त्यानंतर शिकाऊ वाहन परवाना दिला जाताे.

टॅग्स :वाहन