२०१६ ला धावणार ‘बुलेट’सारखी ‘ट्रेन सेट’
By Admin | Updated: March 1, 2015 23:28 IST2015-03-01T23:28:57+5:302015-03-01T23:28:57+5:30
आर्थिक टंचाईमुळे मोदी सरकारच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन धावणे अशक्य असले तरी तिच्यासारखीच वेगवान अशी ‘ट्रेन सेट’ पुढील वर्षी सध्याच्याच ट्रॅकवर उतरविण्याची तयारी करण्यात आली आहे.
२०१६ ला धावणार ‘बुलेट’सारखी ‘ट्रेन सेट’
नवी दिल्ली : आर्थिक टंचाईमुळे मोदी सरकारच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन धावणे अशक्य असले तरी तिच्यासारखीच वेगवान अशी ‘ट्रेन सेट’ पुढील वर्षी सध्याच्याच ट्रॅकवर उतरविण्याची तयारी करण्यात आली आहे.
यंदा रेल्वे अर्थसंकल्पात ‘ट्रेन सेट’ची घोषणा करण्याआधीच रेल्वेने आंतरराष्ट्रीय बाजारातील विविध उत्पादकांशी विविध पैलूंवर अनौपचारिक चर्चा चालविली आहे. त्यात तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करारही समाविष्ट आहे. अर्थसंकल्पात घोषणा करताच रेल्वेने त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. २०१६ मध्ये मेट्रो रेल्वे सेटची डिझाईन असलेल्या ३ ते ४ ‘ट्रेन सेट’ रुळावर धावताना दिसतील. प्रस्तावित ‘ट्रेन सेट’मध्ये २१ डबे असतील. त्यांची किंमत प्रत्येकी १५० कोटी रुपये असेल. बुलेट ट्रेनचा प्रकल्प अतिशय महागडा ठरणार असल्यामुळे ‘ट्रेन सेट’ला देशी बुलेट ट्रेन म्हटले, तर वावगे ठरणार नाही. ‘ट्रेन सेट’ आणण्याची कल्पना भारतातील परिस्थितीला पूर्णपणे अनुकूल असून, ती अयशस्वी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
राजधानी, शताब्दीचा वेग वाढेल...
येत्या तीन वर्षांत लांब पल्ल्याच्या राजधानी व शताब्दी एक्स्प्रेसला ‘ट्रेन सेट’मध्ये परावर्तित करता येईल. या दोन्ही गाड्यांचा कमाल वेग १३० कि.मी. प्रतितास असून थांब्यासाठी लागणारा वेळ पाहता सरासरी वेग ९० ते १०० कि.मी. एवढाच होतो. या दोन्ही गाड्यांना ट्रेन सेटमध्ये बदलण्यात आल्यास त्यांचा वेग १५० कि.मी. प्रतितास एवढा होऊ शकतो. त्यामुळे हावडा-नवी दिल्ली, मुंबई-नवी दिल्ली मार्गावरील प्रवास किमान तीन ते चार तासांनी कमी होईल.
(लोकमत न्यूज नेटवर्क)