रेल्वे प्रवाशांनी एटीव्हीएम मशिनकडे फिरवली पाठ
By Admin | Updated: September 24, 2014 02:29 IST2014-09-24T02:29:13+5:302014-09-24T02:29:13+5:30
एटीव्हीएम मशिन असतानाही रेल्वे प्रवाशांची तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांग लागत आहे. स्मार्ट कार्डच्या वापराबाबत जनजागृती नसल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली

रेल्वे प्रवाशांनी एटीव्हीएम मशिनकडे फिरवली पाठ
नवी मुंबई : एटीव्हीएम मशिन असतानाही रेल्वे प्रवाशांची तिकीट खिडक्यांवर लांबच लांब रांग लागत आहे. स्मार्ट कार्डच्या वापराबाबत जनजागृती नसल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली जात आहे. तर रेल्वे प्रशासन देखील प्रवाशांमध्ये स्मार्ट कार्ड वापराबद्दल जनजागृतीस उदासीनता दाखवत आहे.
रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडक्यांवर लागणारी रांग कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्मार्ट कार्ड संकल्पना राबवली आहे. त्याकरिता प्रत्येक रेल्वे स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिन (आॅटोमॅटीक तिकीट वेंडिंग मशिन) बसवण्यात आल्या आहेत. या मशिनद्वारे स्मार्ट कार्डधारक आपल्याला हवे असलेल्या प्रवासाचे तिकीट सहज काढू शकतात. त्याकरिता रेल्वे प्रवाशाकडे स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांचा तिकीट खिडकीवर रांगेचा त्रास टळत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या संकल्पनेला मुंबई उपनगर क्षेत्रात प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद लाभत आहे. तर मुंबईच्या काही स्थानकांमध्ये एटीव्हीएम मशिनची कमतरता देखील भासत आहे. नवी मुंबईत मात्र याउलट परिस्थिती आहे.
शहरातील प्रत्येक स्थानकांमध्ये २ ते ४ एटीव्हीएम मशिन बसवण्यात आल्या आहेत. परंतु एटीव्हीएम मशिन असतानाही प्रवासी त्याकडे पाठ फिरवत आहेत. स्मार्टकार्ड वापराची माहिती नसल्याने अनेकांनी ते घेतलेले नाही. अशा प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ते तिकीट खिडकीवर रांग लावूनच तिकीट काढण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे वाशी, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या स्थानकांच्या तिकीट खिडक्यांवर मोठ्या रांगा लागत आहेत. (प्रतिनिधी)