अवैध वाहतुकीचा एसटीला फटका

By Admin | Updated: February 12, 2015 22:36 IST2015-02-12T22:36:56+5:302015-02-12T22:36:56+5:30

उरण परिसरात नवी मुंबई, मुंबईतून दररोज २५० खासगी गाड्या पंधरा हजार प्रवाशांची अनधिकृतपणे ेवाहतूक करीत आहेत

Traffic Strike | अवैध वाहतुकीचा एसटीला फटका

अवैध वाहतुकीचा एसटीला फटका

उरण : उरण परिसरात नवी मुंबई, मुंबईतून दररोज २५० खासगी गाड्या पंधरा हजार प्रवाशांची अनधिकृतपणे ेवाहतूक करीत आहेत. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ही अवैध प्रवासी वाहतूक राजरोसपणे सुरू असून या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे उरण एसटी डेपोला दररोज सुमारे दोन लाख रुपयांच्या आर्थिक उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. त्याकडे तक्रारीनंतरही संबंधितांकडून कानाडोळा केला जात असल्याने उरण एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे.
उरण परिसराच्या वाढत्या औद्योगिकरणामुळे व्यापार व कामधंद्याच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कारण देशातील अग्रेसर ओएनजीसी, नौदल, शस्त्रागार, बीपीसीएल प्रकल्पांबरोबर अनेक रासायनिक कंपन्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर येथे जेएनपीटी, जीटीआय, डीपी वर्ल्डसारखी आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. या बंदरावर आधारित ८० सीएफएस आणि कंटेनर गोदामे आहेत. या बंदरातून मोठ्या प्रमाणात आयात-निर्यातीच्या व्यापारामुळे दिवसेंदिवस प्रवासीसंख्येत अधिकच भर पडत चालली आहे. दररोज उरण परिसरात विविध मार्गाने ८० ते ९० हजार प्रवासी व्यापार व कामधंद्यानिमित्ताने येतात. त्यापैकी दररोज ३०-३५ हजार प्रवासी एसटीने ये-जा करतात. १५-२० हजार प्रवासी एनएमएमटीने तर मुंबई-मोरा या सागरीमार्गावरून २५००-३५०० तर मुंबई-जेएनपीटी येथून १५००-२५०० प्रवासी प्रवास करतात. मालकीच्या दुचाकी, चारचाकी वाहनाने ७ हजार प्रवासी ये-जा करतात. तसेच दररोज १५ ते २० हजार कामगार प्रवासी नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरातून नवघर, जेएनपीटी कामगार वसाहत, करळफाटा, जासई, पोर्ट, युजर्स बिल्डिंग, जेएनपीटी प्रवेशद्वारपर्यंत स्टार बस ये-जा करतात. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणांहून दररोज सुमारे ३०० अनधिकृत खासगी वाहनातून होणाऱ्या प्रचंड प्रमाणात अवैध प्रवासी वाहतुकीचा परिणाम उरण एसटी डेपोवर होत असून दररोज सुमारे दोन लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याचे कामगारांकडून सांगण्यात येत आहे.
उरण एसटी डेपोला अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहतूकदारांबरोबरच आरामदायी सेवा देणाऱ्या एनएमएमटीशही स्पर्धा करावी लागते. एसटीला थेट सेवा देता येत नाही. त्यामुळे प्रवासी थेट इच्छित स्थळापर्यंत पोहोचविण्यासाठी खासगी वाहनांच्या आश्रयाला जातात. त्यातच नियमित आणि आरामदायी सेवा देण्यात एसटी अपयशी ठरत आली आहे. खासगी आणि एनएमएमटीसारखारख्या बलाढ्य वाहतूकदारांशी स्पर्धा करण्यासाठी आरामदायी बसेस देण्यासाठी मागणी उरण डेपोने सातत्याने चालविली आहे. मात्र त्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्षच केले जात असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. मात्र स्पर्धा करण्याची इच्छा असूनही आवश्यक पाठबळ वरिष्ठांकडून मिळत नसल्याची कामगारांची तक्रार आहे. (वार्ताहर)

Web Title: Traffic Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.