प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

By Admin | Updated: December 29, 2014 23:09 IST2014-12-29T23:09:51+5:302014-12-29T23:09:51+5:30

ठाण्यात झालेल्या युवतीतीच्या ‘त्या’ घटनेनंतर ठाणे परिसरातील रिक्षा मालकांना ठाणे पोलिसांतर्फे प्रत्येकास विशेष ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे.

Traffic safety question on the anvil? | प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर?

अनिकेत घमंडी - डोंबिवली
ठाण्यात झालेल्या युवतीतीच्या ‘त्या’ घटनेनंतर ठाणे परिसरातील रिक्षा मालकांना ठाणे पोलिसांतर्फे प्रत्येकास विशेष ओळखपत्र (स्मार्ट कार्ड) देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र त्या योजनेस कल्याण-डोंबिवली परिसरातून अल्प प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीचा अभाव यासह रिक्षा चालक-मालकांमध्येही याबाबतचे फारसे गांभिर्य नसल्याचे आढळून येत आहे.
शहर वाहतूक नियंत्रण विभागाकडून मिळालेल्या माहितीनूसार डोंबिवलीत सुमारे ५ हजार अधिकृत रिक्षा आहेत. त्यापैकी आतापर्यंत अवघ्या ४०० रिक्षा मालकांचीच माहिती मिळाली असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. या स्मार्ट कार्ड संकल्पनेबाबत विभागीय पोलिस उपायुक्तांनी ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातील वाहतूक पोलीसांना संबंधित ठिकाणी सर्व रिक्षा मालकांशी संवाद साधून ही माहिती लवकरात लवकर मिळवावी अशा सूचना दिल्या होत्या, मात्र दैनंदिन काम करुन हे अतिरीक्त काम करण्यासाठी पोलीस यंत्रणेने रिक्षा मालकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण पुढे केले आहे. डिसेंबर महिन्यात अवघ्या काहींनीच या सुविधेचा लाभ घेतला आहे.

स्मार्ट कार्ड अन्वये नोंदणी प्रक्रिया सुरुच आहे, त्यासाठी रिक्षा मालकांचे सहकार्य अपेक्षित आहे. जानेवारी महिन्यात सुरक्षा सप्ताहांतर्गत सर्व चालक-मालक युनियनशी संपर्क साधून त्यांनीही या आग्रह धरत या उपक्रमात जास्तीत जास्त नोंदी कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील.
- बाळासाहेब कदम,
पोलीस निरीक्षक,
डोंबिवली शहर वाहतूक विभाग.

प्रवाशांना काय लाभ ?
रात्री-अपरात्री एखादी महिला एकट्याने रिक्षेतून प्रवास करतांना काही अप्रिय घटना घडू नये, आणि घडल्यास संबंधित चालक-मालकाची सर्व माहिती तात्काळ प्रवाशालाही मिळू शकेल. जेणेकरुन मिळालेल्या माहितीनूसार संबंधितावची तपासणी-चौकशी तात्काळ करण्यात येईल.

काय आहे स्मार्ट कार्ड योजना :
या योजनेंतर्गत दिल्या जाणा-या फॉर्ममध्ये संबंधित रिक्षाच्या मालकाचे नाव, पूर्ण पत्ता, मूळ निवासाचा राज्य,जिल्हा, तालुकानिहाय पत्ता, संपर्काचे क्रमांक, परमीट क्रमांक, चालक/मालक बिल्ला क्रमांक (बॅच क्रमांक), लायसन्स नं., गाडीचा नोंदणी क्रमांक (रजिस्ट्रेशन क्रमांक), आधार कार्ड क्रमांक, संबंधितांचा फोटो आदी सर्व तपशीलाची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्यासाठी साधारणत: प्रत्येक अर्जदारामागे १०० रुपये आकारले जाणार आहेत.

बारकोडने मिळणार माहिती
अशा पद्धतीने फॉर्म भरुन दिल्यावर रिक्षामध्ये प्रवासी ज्या ठिकाणी बसतात त्या समोरच्या बाजूस चालकाच्या मागे पिवळया रंगाचे कार्ड चिटकवण्यात येईल. त्यावर संबंधिताची सर्व माहिती असेल, तसेच या कार्डाच्या एका बाजूस ‘बारकोड’ पद्धतीचे स्टीकर असेल. सुरक्षा यंत्रणेने एखाद्या तपासात त्याची शहानीशा केल्यास कार्डवर असलेली माहिती आणि बारकोडच्या माध्यमातून यंत्रणेकडे असलेली माहिती टॅली केली जाईल. अशीही यंत्रणा आहे.

सुरक्षा यंत्रणेला काय लाभ :
या उपक्रमांतर्गत ज्या रिक्षांची नोंद होईल त्या साहजिकच अधिकृत असतील असा सुरक्षा यंत्रणेचा विश्वास आहे. त्यातच ज्या प्रवाशांना काही तक्रार असेल त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यास त्यावरुन नेमक्याची चौकशी होईल. जेणेकरुन तपास यंत्रणेची चक्रे वेगाने फिरतील आणि न्याय प्रक्रियाही अधिक जलद गतीने होईल, तसेच संबंध नसलेल्या रिक्षावाल्यांची चौकशी-तपासणीही होणार नाही, नाहक कोणालाही त्रास होणार नाही, हा उद्देश आहे.

 

Web Title: Traffic safety question on the anvil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.