वाहतूक नियम जनजागृतीसोबत नियमसक्तीही हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 02:27 AM2020-02-20T02:27:55+5:302020-02-20T02:28:08+5:30

तज्ज्ञांचे मत : नियम मोडल्यामुळे होतात सर्वाधिक अपघात, दंड आकारण्याची गरज

Traffic rules should be regulated along with awareness! | वाहतूक नियम जनजागृतीसोबत नियमसक्तीही हवी!

वाहतूक नियम जनजागृतीसोबत नियमसक्तीही हवी!

Next

मुंबई : देशात होणाऱ्या अपघातांमध्ये सर्वाधिक अपघात हे वाहतूक नियम मोडल्यामुळे होत असल्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळेच राज्यात अपघात कमी करण्यासाठी प्रशासनासह विविध स्वयंसेवी संस्थांकडून वाहतूक नियम जनजागृतीवर भर दिला जातो. पण तरीही अपघातांचे सत्र कायम आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियम जनजागृतीसोबत त्या नियमांच्या सक्तीवर भर देणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

राज्यात गेल्या वर्षभरात ३२,८७६ रस्ते अपघात झाले. त्यामध्ये १२,५६५ जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे प्रमुख कारण वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि वेगात वाहने चालविणे हे आहे. त्यामुळे वेगाने वाहन चालवणाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
याबाबत वाहतूक अभ्यासक संदीप गायकवाड म्हणाले, अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची जनजागृती करायला हवी. पण त्याला काही मर्यादा हव्यात. प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), पोलीस, शिक्षण खाते, सामाजिक संस्था नेहमी जनजागृतीवर भर देतात. पण केवळ जनजागृतीमुळे लोकांना शिस्त लागते असे दिसत नाही. त्यामुळे जनजागृतीला कारवाईची जोड द्यायला हवी. परिणामी जनजागृती करण्याबरोबर नियम मोडल्यास दंड केला तर त्या व्यक्तीच्या अधिक लक्षात राहते, असे ते म्हणाले.

कारवाईच्या भीतीने करतात
हेल्मेट, सीटबेल्टचा वापर
चालकांकडून कारवाईच्या भीतीने हेल्मेट, सीटबेल्टचा वापर केला जातो. त्यामुळे अनेकदा चांगल्या दर्जाच्या हेल्मेटचा वापर केला जात नाही. तर सीटबेल्टही केवळ काही काळच लावला
जातो.
- करण देसाई, युनायटेड वे, स्वयंसेवी संस्था

जनजागृतीनंतर केलेली कारवाई परिणामकारक
आधी वाहतूक नियम जनजागृती की कारवाई, हा प्रश्न असतो. परंतु अगोदर जनजागृती व्हायला हवी. त्यानंतर कारवाई केली गेली पाहिजे. कारण अगोदर कारवाई केली तर पोलिसांकडून त्रास दिल्याचा वाहनचालक आरोप करतात. कारवाई करताना पोलिसांशी वाद घालतात; पण त्यांची जनजागृती केली तर ते कारवाईला सामोरे जातात. त्यामुळे जनजागृतीनंतर केलेली कारवाई परिणामकारक होते.
- विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस (मुख्यालय)

४,६९,४१८ इतके अपघात २०१८ साली संपूर्ण देशात झाले.
१,५१,४१७ जणांचा या अपघातांत मृत्यू झाला.
१,०६,३५२ जणांचा मृत्यू वेगाने किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याने झाला.
४३,६१६ जण हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्युमुखी पडले.
२४,४३५ इतके मृत्यू सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे झाल्याचे दिसून आले आहे.


पोलिसांऐवजी स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करावी
वाहतूक नियमांबाबत जनजागृतीची सर्व जबाबदारी पोलिसांवर टाकली जाते. ती त्यांची जबाबदारी नसून नियमांची अंमलबजावणी करणे आहे. त्याऐवजी स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करायला हवी. परदेशातदेखील पोलीस जनजागृती करीत नाहीत. कारण यात पोलिसांचा वेळ वाया जातो, असे संदीप गायकवाड म्हणाले.
 

Web Title: Traffic rules should be regulated along with awareness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.