Join us  

‘ओखी’च्या अफवांमुळे वाहतूक पोलीस त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 4:28 AM

गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या ओखी वादळाच्या ‘व्हायरल’ इफेक्टमुळे वाहतूक पोलीस कमालीचे त्रस्त आहेत. शहरातील वांद्रे-वरळी सागरी सेतू (सी-लिंक), पेडर रोड खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात

मुंबई : गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या ओखी वादळाच्या ‘व्हायरल’ इफेक्टमुळे वाहतूक पोलीस कमालीचे त्रस्त आहेत. शहरातील वांद्रे-वरळी सागरी सेतू (सी-लिंक), पेडर रोड खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्याची अफवा मंगळवारी दिवसभर व्हायरल झाली होती. यासंबंधी माहिती घेण्यासाठी पोलिसांच्या नियंत्रण कक्षातदेखील सतत फोन खणखणत होते. यामुळे पोलिसांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. मात्र वाहतूक पोलिसांकडून कोणताही मार्ग बंद करण्यात आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. सागरी सेतू आणि अन्य मार्ग बंद या केवळ अफवा आहेत. नागरिकांनी अशा अफवा पसरवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.अरबी समुद्रातील वादळाच्या पूर्वसूचनेनंतर सतर्कतेचा उपाय म्हणून शाळा-महाविद्यालयांना राज्य सरकारने सुट्टी दिली. ओखी वादळाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक, गोवा येथील व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओला वांदे्र-वरळी सागरी सेतूचे नाव देण्यात आले होते. तसेच पावसामुळे शहरांतील रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला नसल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.वादळामुळे वांद्रे-वरळी सागरी सेतू वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल. त्याचबरोबर पेडर रोड, सायन पूल, एस.व्ही. रोड वांद्रे ते सांताक्रुझ मुसळधार पावसामुळे बंद ठेवण्यात येईल. वांद्रे येथील लिंकिंग रोडवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास खबरदारी म्हणून संबंधित परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल, असा संदेश वाहतूक पोलिसांच्या नावांसह व्हायरल होत होता.मंगळवारी दिवसभर या आशयाचा संदेश व्हायरल झाला. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मुंबई पोलिसांनी अधिकृत टिष्ट्वटर अकाउंटवरुन वांद्रे-वरळी सागरी सेतू सुरू असल्याची माहिती दिली.शिवाय वादाळामुळे रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झालेला नाही. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. परिणामी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले.वादळाचा परिणाम वाहतुकीवर होणार नाही, यासाठी प्रशासन सज्ज आहे.

टॅग्स :सोशल मीडियापोलिस