Join us

Rakshabandhan: रक्षाबंधनाच्या सुट्टीमुळे महामार्गावर वाहनांची गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 06:36 IST

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधून रक्षाबंधनसाठी हजारो नागरिक गावी रवाना झाले आहेत. याशिवाय शनिवार व रविवारची सुट्टी असल्यामुळेही अनेक जण वीकेंड साजरा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पर्यटनस्थळाकडे रवाना झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : रक्षाबंधन व वीकेंडमुळे शुक्रवार व शनिवारी सायंकाळपासून सायन - पनवेल व मुंबई - गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टोलनाका व सिग्नलवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत हाेते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले हाेते.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधून रक्षाबंधनसाठी हजारो नागरिक गावी रवाना झाले आहेत. याशिवाय शनिवार व रविवारची सुट्टी असल्यामुळेही अनेक जण वीकेंड साजरा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पर्यटनस्थळाकडे रवाना झाले. यामुळे शनिवारी सायंकाळपासून सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली होती. सायन - पनवेल महामार्गावरून रोज ८० हजारांपेक्षा जास्त वाहनांची ये - जा सुरू असते. खारघर टोलनाक्यावरून एक लाखापेक्षा जास्त वाहनांची ये - जा सुरू असते. शुक्रवार व शनिवारी सायन - पनवेल महामार्गावरून खारघरवरून दीड लाखापेक्षा जास्त वाहने मुंबई व पनवेलच्या दिशेने गेल्याचा अंदाज आहे.

वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाशी, खारघर टोलनाका, कळंबोली सर्कल, खांदा कॉलनी, पळस्पे फाटा सिग्नलजवळ काही प्रमाणात वाहनांची कोंडी होत होती. वाहनांची संख्या वाढली असली तरी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली नव्हती. आवश्यक त्या ठिकाणी जादा कर्मचारी तैनात केले हाेते, अशी माहिती कळंबोली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक एन. विश्वकार यांनी दिली.

सायन-पनवेल व मुंबई-गोवा महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला होता. वाहनांची संख्या वाढली असली तरी कुठेही चक्काजाम होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.- पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त, वाहतूक

टॅग्स :वाहतूक कोंडी