नवी मुंबईतील गणेश मिरवणुकीला पारंपरिक साज
By Admin | Updated: September 8, 2014 00:18 IST2014-09-08T00:18:50+5:302014-09-08T00:18:50+5:30
गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबईतील सर्व सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. यावर्षी पारंपरिक पध्दतीने, ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात मिरवणूक काढण्याकडे सर्व सार्वजनिक मंडळांचा कल आहे

नवी मुंबईतील गणेश मिरवणुकीला पारंपरिक साज
पूनम गुरव, नवी मुंबई
गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबईतील सर्व सार्वजनिक मंडळे सज्ज झाली आहेत. यावर्षी पारंपरिक पध्दतीने, ढोल-ताशा आणि लेझीमच्या गजरात मिरवणूक काढण्याकडे सर्व सार्वजनिक मंडळांचा कल आहे. तसेच अनेक मंडळे मिरवणुकीद्वारे सामाजिक संदेश देणार असल्याने विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक साज चढलेला दिसत आहे.
गणेशभक्तांनी गणरायाला निरोप देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरवणुकीचे आयोजन केले आहे. यावर्षी मिरवणुकीसाठी प्रामुख्याने नाशिक ढोल-ताशा, झांजपथक, लेझीम पथकांची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचबरोबर सानपाडा पामबीच येथील नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाने मिरवणुकीसाठी ब्रान्झ पथक मागवले आहे. तरुण मुले ढोलाच्या तालावर लेझीमचा फेर धरणार आहेत.
ऐरोली येथील ऐरोलीचा राजा लोकमान्य सेवा समिती मंडळाच्या वतीने पारंपरिक पध्दतीने वारकरी सांप्रदायाच्या भजन- कीर्तनाचे आयोजन केले आहे. तसेच मिरवणुकीमध्ये टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात सर्व वारकरी मिरवणुकीमध्ये सहभाग घेणार आहेत. ट्रॉली आणि रथातून ऐरोलीच्या राजाची ऐरोली सेक्टर ५ पासून या मिरवणुकीला सुरुवात होणार असून रबाळे तलावात गणरायाचे विसर्जन होणार आहे.
वाशी सेक्टर १ येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व्यापारी संघातर्फे पारंपरिक पध्दतीने मिरवणूक काढली जाणार आहे. गणरायाच्या मूर्तीचे पालखीमधून विसर्जन केले जाणार आहे. तर मिरवणुकीत ढोल, ताशा, झांज आणि लेझीम पथक असणार आहे. तर आग्रोळी ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवत आहेत. यंदाही ही संकल्पना राबवली असून ग्रामस्थांनी एकत्रितरित्या विसर्जनाची तयारी केली आहे. या मिरवणुकीमध्ये वारकरी मंडळाच्या वतीने भजन आणि विठू माउलीचा गजर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गावातील सर्व महिला एकसारखा पोषाख परिधान करून आगरी कोळी गीतावर नृत्य सादर करणार आहेत.