The towing car was stolen in mumbai | टोइंग केलेली कारच चोरीला...
टोइंग केलेली कारच चोरीला...

मुंबई : नो पार्किंगमध्ये असलेल्या कारला टोइंग करत, आझाद मैदान वाहतूक चौकीमागे ठेवले. दुसऱ्या दिवशी कार गायब झाल्याने खळबळ उडाली. सीसीटीव्हीमध्ये चोरीचा घटनाक्रम कैद होताच वाहतूक पोलिसांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल केला. ई-चलानच्या मदतीने पोलीस मालकाच्या घरी धडकले, तेव्हा चोरी केलेली कार तेथेच पार्क केलेली मिळून आली.

कुलाबा परिसरात नो पार्किंगमध्ये असलेल्या एमएच ४७ एएन ३६३९ कार मालकाविरुद्ध ई-चलानद्वारे आॅनलाइन तक्रार देत, पोलिसांनी कार टोइंग केली. आझाद मैदान वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर ढेरे यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्याचीही जबाबदारी होती. त्यामुळे ती कार आझाद मैदान
वाहतूक चौकीमागे ठेवण्यात आली होती.
सोमवारी सकाळी कार जागेवर नसल्याने पोलिसांचा गोंधळ उडाला. त्यांनी शोध सुरू केला. अखेर सीसीटीव्ही फुटेजमध्ये मध्यरात्री अडीचच्या सुमारास एकाने टोइंग केलेल्या कारचा लॉक लावलेला टायर काढला आणि कारला नवीन टायर लावून तेथून कार नेली. त्यानुसार, साहाय्यक फौजदार संभाजी पवार यांच्या तक्रारीवरून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आल्याचे ढेरे यांनी
सांगितले.
पुढे, ई-चलान घेऊन पोलीस कार मालकाच्या घरी धडकले. तेव्हा कार त्याच्याकडेच असल्याची माहिती समोर आल्याचेही ढेरे यांनी नमूद केले. त्यानुसार, आझाद मैदान पोलिसांनी आरोपी मालकाला ताब्यात घेत अधिक तपास सुरू केला आहे. त्याच्याकडील कारही ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती आझाद मैदान पोलिसांनी दिली.
 

Web Title: The towing car was stolen in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.