Join us

म्हाडाच्या कोट्यवधींच्या तीन घरांसाठी आले तब्बल १३० अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 07:01 IST

३९ जणांनी भरली अनामत रक्कम; नोंदणीसाठी उरले अवघे दोन दिवस

- अजय परचुरे मुंबई : मुंबईत स्वत:चे हक्काचे घर व्हावे अशी प्रत्येक मुंबईकराची इच्छा असते. मात्र, अनेकांच्या खिशाला ते परवडत नाही. त्यामुळेच परवडणाऱ्या घरांसाठी हक्काची लॉटरी म्हणून म्हाडाच्या दरवर्षीच्या लॉटरीकडे अनेक मुंबईकरांचे लक्ष लागलेले असते. मात्र, म्हाडाने मुंबईच्या यंदाच्या लॉटरीत ५ कोटींची तीन महागडी घरे उपलब्ध करून दिली. साहजिकच या महागड्या घरांना प्रतिसाद मिळेल का, याबाबत सर्व साशंक होते. मात्र, ग्रँट रोडच्या धवलगिरीतील उच्च गटात मोडणाºया म्हाडाच्या या प्रत्येकी ५ कोटींच्या तीन घरांसाठी आतापर्यंत तब्बल १३० अर्ज आले आहेत.मुंबईतील ग्रँट रोड भागातील कंबाला हिल येथील धवलगिरी इमारतीतील सर्वांत महागडी ३ घरे म्हाडाच्या लॉटरीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या घरांचे क्षेत्रफळ ९८५ चौरस फूट आहे. दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडमधील उच्च मध्यमवर्गात मोडणाऱ्या परिसरात ही घरे असल्यामुळे आणि या घरांची किंमत प्रत्येकी ५ कोटी रुपये असल्यामुळे या घरांना या लॉटरीत कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत मुंबईकरांसोबतच म्हाडा अधिकाºयांच्याही मनात साशंकता होती. शिवाय आतापर्यंतचा इतिहास पाहता यापूर्वी काहींनी लॉटरीत घरे लागूनही ती महागडी असल्याचे सांगत परत केली. त्यामुळे ५ कोटींच्या या घरांसाठी अर्ज येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.५ नोव्हेंबरला म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या १,३८४ घरांच्या लॉटरीसाठी दुपारी २ वाजल्यापासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हाडाच्या या ३ महागड्या घरांसाठी तब्बल १३० जणांनी ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली आहे. उच्च गटात मोडणाºया या ३ घरांसाठी ऑनलाइन अर्जाबरोबर तब्बल ७५ हजार ३३६ रुपये अनामत रक्कम भरावयाची आहे. ही रक्कम १३० पैकी ३९ जणांनी भरून या लॉटरीतील ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली आहे. नोंदणीसाठी आता केवळ दोन दिवस उरले असून लॉटरीचा निकाल १६ डिसेंबरला लागणार आहे.

टॅग्स :म्हाडामुंबई