Join us
Daily Top 2Weekly Top 5

मरणानंतरही छळ सुरूच! अखेरचा प्रवास रखडला, १०७ मृतदेह बेवारसच; वर्षभरापासून ओळख पटेना

By मनीषा म्हात्रे | Updated: February 23, 2026 09:20 IST

रुग्णालय प्रशासन, पोलीस आयुक्तांकडून संबंधित पोलिस ठाण्यांना तातडीने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

-मनीषा म्हात्रे, मुंबई मुंबईसारख्या न थांबणाऱ्या शहरात आयुष्याची धावपळ कधीच थांबत नाही; पण काहींची धावपळ मृत्यूनंतरही संपत नाही. रुग्णालयाच्या शवागृहात ओळखीच्या आणि शेवटच्या निरोपाच्या प्रतीक्षेत शेकडो मृतदेह पडून आहेत. मुंबईच्या सरकारी रुग्णालयांच्या शवागृहात सध्या १०७ बेवारस मृतदेह वर्षभरापासून अंत्यविधीच्या प्रतीक्षेत आहेत. 

अपघातग्रस्त, रस्त्यांवर आयुष्य कंठलेले भिक्षेकरी, विस्मरणात गेलेले ज्येष्ठ नागरिक ज्यांच्या आयुष्याचा शेवट कुठे झाला, हे माहीत आहे; पण ते कोण होते, हे मात्र अजूनही कोडेच आहे. रुग्णालय प्रशासन, पोलीस आयुक्तांकडून संबंधित पोलिस ठाण्यांना तातडीने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

एमएमआर परिसरात दरमहा शेकडो मृतदेह सापडतात. त्यातील ६० टक्के मृतदेह नातेवाईक ताब्यात घेतात. उर्वरित ४० टक्के मृतदेह बेवारस राहतात. हे मृतदेह रुग्णालयांतील शवविच्छेदन केंद्रात पाठवले जातात. 

नियमांनुसार मृतदेहांची ३० दिवसांत विल्हेवाट लावणे अपेक्षित आहे; पण ओळख पटवण्याची प्रक्रिया, कायदेशीर औपचारिकता यामुळे काही मृतदेह महिनोन्महिने, कधी वर्षभर तिथेच पडून राहतात. संख्या वाढली की वातानुकूलित यंत्रणांवर ताण येतो. मृतदेह कुजण्यास सुरुवात होते, उंदीरही वाढत असल्याचे त्यांनी मृतदेह कुरतडण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत.

ओळख पटवण्यासाठी कसून प्रयत्न

मृतांचे फोटो सर्व पोलीस ठाण्यांना तसेच अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवले जातात. बेपत्ता व्यक्तींच्या नोंदीही तपासल्या जातात. टॅटू, जन्मखूण, कपड्यांवरील खास चिन्हे यांचा आधार घेतला जातो. 

अनेकदा नाव, जोडीदाराचे नाव किंवा धार्मिक चिन्हांचे टॅटू ओळख पटवण्यास मदत करतात. अनोळखी मृतदेहांबाबत नमुने जतन करून कालिन्यातील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत डीएनए प्रोफाइलिंग केली जाते. हा डीएनए प्रोफाइल काही महिने जतन ठेवला जातो.

कुपर रुग्णालयात सर्वाधिक ४६ मृतदेह आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जुहू पोलिस ठाण्याअंतर्गत एक मृतदेह ४ जून २०२४, सांताक्रुझच्या हद्दीत ८ ऑक्टोबर २०२४ पासून मृतदेह पडून आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Unclaimed Bodies Linger, Awaiting Final Rites for Over a Year

Web Summary : Unclaimed bodies, numbering 107, remain in Mumbai's morgues for over a year, awaiting identification and final rites. These are accident victims, homeless individuals, and forgotten elderly. Despite efforts using photos, tattoos, and DNA, their identities remain unknown, causing strain on morgue facilities.
टॅग्स :मुंबईमृत्यूमुंबई पोलीसहॉस्पिटल