महाराष्ट्रात टॉप : प्रत्येक अंगणवाडीत बाल सुलभ शौचालय
By Admin | Updated: August 19, 2014 23:48 IST2014-08-19T22:57:11+5:302014-08-19T23:48:33+5:30
सातारा जिल्हा परिषद मुलींसाठी स्वतंत्र शौचालय उभारणीत ‘नंबर वन’

महाराष्ट्रात टॉप : प्रत्येक अंगणवाडीत बाल सुलभ शौचालय
सातारा : जिल्हा परिषद शाळांत मुलींसाठी वेगळी शौचालये उभारणीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या ताज्या अहवालात समोर आले आहे. मात्र, महाराष्ट्राचा विचार करता सातारा जिल्हा परिषद मुलींसाठी स्वतंत्र शौचालय उभारणीत ‘नंबर वन’ आहे. केंद्र शासनाचे ‘निर्मल भारत अभियान’ अस्तित्वात येण्यापूर्वीच सातारा जिल्ह्याने हा मान पटकावला आहे.
सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या शाळांची संख्या २४७८ इतकी आहे. या सर्व शाळांमध्ये मुला आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे. ही संख्या ४,८७८ इतकी आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अंगणवाडीत ‘बाल सुलभ शौचालय’ उभारणी करण्यात आली असून ही संख्या ३६५0 इतकी आहे.
ग्रामस्वच्छता आणि निर्मलग्राम चळवळ सातारा जिल्ह्यात वेगाने वाढली. अनेक शाळा आणि गावांमध्ये श्रमदान करून शौचालयाची उभारणी झाली. १९९९ मध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान सुरू झाले. यामध्ये प्रायोगिक तत्वावर काही जिल्ह्यांची निवड करण्यात आली. सातारा जिल्ह्यात हेच अभियान २00३ पासून सुरू झाले. मात्र, २0१२ मध्ये या अभियानाचे नाव बदलून ते ‘निर्मल भारत अभियान’ असे झाले. शौचालय उभारणीसाठी देण्यात येणारे अनुदानही वाढवून देण्यात आले. सातारा जिल्ह्याने मात्र निर्मलग्राम अभियान आणि ग्रामस्वच्छता अभियानात इतिहास निर्माण केला. या दोन्ही चळवळींनी सातारा जिल्ह्यात केलेल्या कामांची दखल अगदी ‘युनेस्को’नेही घेतली. अनेक राष्ट्रांनी सातारा जिल्ह्यातील ग्रामस्वच्छता अभियानाची दखल घेतली. (प्रतिनिधी)
ही आहे सातारची ‘निर्मल टीम’
सातारा जिल्ह्यात ही मोहमी वेगाने सुरु होण्यास तत्कालीन अधिकारीही कारणीभूत आहेत. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद नलवडे, विलास पाटील, श्याम देशपांडे, मल्लीनाथ कलशेट्टी, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे त्याचबरोबर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, धनाजी पाटील, संजय पवार, ऋषीकेश शिलवंत, गणेश चव्हाण, अजय राऊत यांनी गावोगावी निर्मलग्राम अभियानाचा प्रसार आणि प्रचार केल्यामुळे हे सारे शक्य झाले. प्रत्येक तालुक्याचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकांनीही त्याकामी मोलाचे सहकार्य केले आहे.