Join us

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पावले उचला; हायकाेर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 03:16 IST

थुंकण्याविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घ्या. लोकांना संवेदनशील करा, अशी सूचना मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केली.

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करणाऱ्या लोकांवर आळा घालण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व मुंबई महापालिकेला दिले. तसेच अशा लोकांकडून अधिक दंडाच्या रक्कम वसुलीची सूचनाही केली.थुंकण्याविरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घ्या. लोकांना संवेदनशील करा, अशी सूचना मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केली. बॉम्बे पोलीस ऍक्टअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून १२०० रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. मात्र, प्रशासन गुन्हेगारांकडून केवळ २०० रुपये दंड आकारते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.सध्याच्या काळात २०० रुपयांना काय किंमत आहे? तुम्ही महसूल बुडवत आहात. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची लोकांची सवय मोडली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले. कोरोनाच्या काळात लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकून घाण करत आहेत. त्यांना आळा घालावा, यासाठी अमरीन वांद्रेवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.पोलीस व टॅक्सी संघटनांना सार्वजनिक ठिकाणी न थुंकण्याबाबत संवेदनशील करण्याचे निर्देश पालिका, सरकारला द्यावेत, या याचिकाकर्तीच्या मागणीवर उत्तर द्या, असे निर्देश उच्च न्यायालयाने पालिका व सरकारला दिले. व सुनावणी २१ एप्रिलला ठेवली. 

टॅग्स :मुंबई हायकोर्ट