मुंबई: नोकरी, व्यवसाय अथवा पर्यटनानिमित्त सतत परराज्यांत स्वतःच्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी आरटीओने भारत (बीएच) सीरिज सुरू केली आहे. 'बीएच'साठी दर दोन वर्षांनी रस्ता कर भरावा लागतो, अन्यथा प्रतिदिन १०० रुपये दंड आकारला जातो. मुंबईतील ताडदेव, बोरीवली आणि अंधेरी आरटीओ कार्यालयांमध्ये १० हजार 'बीएच' सिरीजची वाहनांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ३३९ वाहनधारकांना ३९ लाख ९२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ पासून 'बीएच' मालिका नोंदणी आणली आहे. प्रत्यक्षात १५ सप्टेंबर २०२१ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 'बीएच' मालिकेअंतर्गत नोंदणी झालेल्या वाहनाच्या मालकाला दर दोन वर्षांनी ज्या राज्यात तो आहे, तेथील अधिसूचित दरापेक्षा २५ टक्के जास्त दराने वाहन कर भरावा लागतो. अशा वाहनांच्या हस्तांतरणाशी संबंधित आरटीओवरील भारही हलका होतो; परंतु दोन वर्षानी कर न भरल्याने दररोज १०० रुपये प्रमाणे वार्षिक कर न भरल्यास वर्षाला ३६ हजार दंड लागू होतो. मुंबईमधील अशाच अनेक वाहनधारकांना हा दंड ठोठवण्यात आला आहे.
आरटीओचे पात्रतेसाठी निकष
राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, चार किंवा अधिक राज्यांमध्ये कार्यालये असलेल्या खासगी कंपन्यांचे कर्मचारी.
अर्ज प्रकिया अशी...
'मॉर्थ' वाहन पोर्टलवर लॉगिन करा.
फॉर्म २० भरावा.
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी फॉर्म ६०, वर्क सर्टिफिकेट आणि कर्मचारी ओळखपत्राची प्रत जमा करावी.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
ऑनलाइन शुल्क भरा.
परराज्यांत बदली होणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा
परराज्यांत बदली होणाऱ्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 'बीएच' सिरीजमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्येक राज्य बदलल्यानंतर त्यांना वाहनाची पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे त्यांचा वेळ आणि खर्च वाचत आहे.