Join us  

वाढलेल्या महागाई विरोधात जागे करण्यासाठीच उद्याचा भारत बंद - संजय निरुपम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 8:24 PM

मुंबई - पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि वाढत्या महागाईविरोधात उद्या सोमवार दि.10 सप्टेंबर 2018 रोजी काँग्रेस सोबत 21 विरोधी पक्षांनी मिळून उद्या भारत बंदचे आवाहन केलेले आहे. या भारत बंद बद्दल मुंबईतील व्यापारीवर्ग आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी गोरेगाव पश्चिम ते अंधेरी पश्चिम विभागातील सर्व दुकाने, बाजारपेठ, हॉटेल्स व मॉल्स ना भेट दिली. त्यांना भारत बंदची माहिती दिली व सर्वांना या बंद मध्ये सहकार्य करण्याचे व आपले सर्व व्यवहार उद्या बंद ठेवण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, मागील 4 वर्षांमध्ये, भाजपचे सरकार आल्यापासून, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. घरगुती गॅस जो 4 वर्षांपुर्वी 350 ते 400 रुपयांना मिळायचा त्यासाठी आता 750 ते 800 रुपये मोजावे लागत आहे. महागाई सुद्धा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रेल्वे तिकिटांचे दर वाढलेले आहे. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या दरामध्ये वाढ झाली आहेत. भाजीपाला महागला आहे. वाढीव जीएसटीमुळे लोक त्रस्त झालेले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले आहे. व्यापरिवर्ग देखील या महागाईमुळे त्रस्त झालेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीमुळे तर देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडून गेली आहे. या भाजप सरकारला त्यांना मिळालेल्या सत्तेची खूप घमेंड आली आहे, अहंकार चढला आहे आणि म्हणूनच ते सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे. या अहंकारी भाजप सरकारची घमेंड उतरवण्यासाठी आणि झोपलेल्या भाजप सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस आणि इतर 21 विरोधी पक्षांनी मिळून उद्या सोमवार दि. 10 सप्टेंबर 2018 रोजी भारत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आम्ही आज येथील सर्व व्यापारीवर्ग, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, मॉल्स, हॉटेल्स आणि सर्वसामान्य नागरिकांची भेट घेतली व त्यांना उद्याच्या भारत बंदमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.

टॅग्स :भारत बंदमुंबईसंजय निरुपम