दुपदरीकरणासाठी उद्या कोकण रेल्वेचा मेगाब्लॉक

By Admin | Updated: September 15, 2014 00:01 IST2014-09-14T22:38:23+5:302014-09-15T00:01:39+5:30

मार्गावरील रेल्वेगाड्या तीन तास उशिराने धावणार

Tomorrow Mega Block of Konkan Railway for Doubling | दुपदरीकरणासाठी उद्या कोकण रेल्वेचा मेगाब्लॉक

दुपदरीकरणासाठी उद्या कोकण रेल्वेचा मेगाब्लॉक

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील अत्यंत खडतर बनलेला प्रवास सुखकर करण्यासाठी मार्ग दुपदरीकरणाची गरज निर्माण झाली असून, त्यादृष्टीने मध्य रेल्वेने आता पुढाकार घेतला आहे. जीते आणि पेण स्थानकांदरम्यान येत्या १६ सप्टेंबर २०१४ रोजी दुपारी दीड ते सायंकाळी साडेपाच असा चार तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमध्ये ‘कासू ते रोहा’ रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून याबाबत कोकण रेल्वेला माहिती देण्यात आली असूून, या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेमार्गावरील गाड्यांची वाहतूक दोन ते तीन तास उशिराने होणार आहे.
गेल्या पंधरा वर्षांच्या काळापासून सुरू असलेल्या कोकण रेल्वेसमोर एकच मार्ग असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरडी कोसळणे, गाडी रुळांवरून घसरणे, जमीन खचणे यासारख्या विविध कारणांमुळे कोकण रेल्वेसमोर निसर्गाने अनेक आव्हाने निर्माण केली. त्यातून मार्ग काढताना कोकण रेल्वेच्या नाकी दम आला आहे. त्यातच या मार्गावर गाड्यांची संख्याही वाढली आहे. कोकण रेल्वेचे वाढते महत्त्व व भविष्यातील विस्तार लक्षात घेता गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने हा मार्ग दुपदरी करण्याची मागणी होत आहे. मात्र, त्याबाबत फारशी हालचाल झाली नाही.
गेल्या दोन वर्षांच्या काळात रोहा ते मुंबईदरम्यानच्या मार्गावर रेल्वेगाड्यांना झालेल्या भीषण अपघातानंतर मध्य रेल्वेने मानसिकता बदलत रोहापर्यंतचा मार्ग दुपदरी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गतच हा मेगाब्लॉक येत्या १६ सप्टेंबरला घेण्यात आला असून, त्या चार तासांच्या काळात रोहा-कासू मार्गाचे दुपदरीकरण हाती घेतले जाणार आहे.
यामध्ये तांत्रिक काम सुरू केले जाणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने दोन महिन्यांची कालमर्यादा निश्चित केली आहे. या कामाची सुरुवात करण्यासाठी रोहापर्यंत येणाऱ्या दोन गाड्यांचा मार्ग
कमी करण्यात आला आहे. जीते ते पेण स्थानकांदरम्यान दुपदरी मार्ग करण्याच्या महत्त्वाकांक्षी
प्रकल्पामुळे सीएसटी ते कासू हे १७० किलोमीटरचे अंतर दुहेरी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Tomorrow Mega Block of Konkan Railway for Doubling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.