Join us

पेट्रोलच्या दरात मिळताहेत टोमॅटो; आवक घटल्याने दरामध्ये वाढ, सर्वसामान्यांना आर्थिक फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 11:47 IST

आवक कमी असल्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

मुंबई : मागील वर्षी टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. भाव कमी मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी यंदा टोमॅटोची लागवड कमी प्रमाणात केली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात बाजारात आवक कमी होऊन टोमॅटोचे भाव ८० ते १०० रुपयांच्या घरात पोहचले आहे. पेट्रोल-डिझेलप्रमाणे टोमॅटोचे दर वाढल्याने स्वयंपाक घरात टोमॅटोचा वापर कमी झाला असून भाजीची चव वाढवणारा हा टोमॅटो स्वयंपाकघरातून हद्दपार होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आवक घटल्याने दरामध्ये वाढ-

आवक कमी असल्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात चांगला माल किमान ९० त १०० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

पालेभाज्या महागच-

उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी पीक घेता आलेले नाही. यामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. बाजारात मेथी, कांदापात, शेपू, पालक, कोथिंबीर या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली असून मेथी ४० रुपये तर, कोथिंबीर ५० ते ६० रुपये जुडी विकली जात आहे. चांगल्या दराच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली आहे. मोठी आवक होत असल्याने कांद्याचे दर घसरले. ३० रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता १५ ते २० रुपये किलो आहे.

पेट्रोल-डिझेल स्वस्त, भाजीपाला महाग-

केंद्र शासनाने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने पेट्रोल-डिझेलचे दर थोड्या फार प्रमाणात कमी झाले असून, पेट्रोल १११ रुपये लिटरपर्यंत आले आहे. याउलट भाजीपाला महागाईचा उच्चांक गाठत असल्याचे दिसते.

डिझेलचे दर कमी झाल्यामुळे मालवाहतुकीचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे महागाई निश्चितच कमी होण्यास मदत होईल, शिवाय भाजीपाल्यांचे दरही कमी होतील. - श्रीकांत काळे, वाहतूकदार

टॅग्स :महागाईमुंबई