Join us  

टोमॅटो पेट्रोलपेक्षा महागलंय, वाढत्या महागाईवरुन शिवसेनेनं सोडले तिखट बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 7:54 AM

देशात ऑक्टोबरमध्ये देशभरातील घाऊक महागाई निर्देशांक तब्बल 12.54 टक्क्यांवर पोहोचला. घाऊक महागाईचा निर्देशांक दोन अंकी म्हणजे 10 टक्के पिंवा त्याहून अधिक नोंदवला जाण्याचा हा सलग सातवा महिना आहे.

ठळक मुद्देहिवाळ्यात 25 रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता 100 रुपये किलोवर पोहोचला आहे. अंदमान-निकोबारमध्ये तर टोमॅटो 113 रुपये किलो म्हणजे पेट्रोलपेक्षाही महाग विकला जात आहे.

मुंबई - देशात महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असून भाजीपाल्यापासून ते सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम इतर घटकांवर होत असल्याने महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईवरुनच शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच, हिवाळ्यात स्वस्त असणारा टोमॅटो पेट्रोलपेक्षाही अधिक महाग झालाय, तर वाटाण्यानेही 150 रुपयांचा आकडा पार केलाय, असे म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारवर तिखट बाण सोडले आहेत. 

देशात ऑक्टोबरमध्ये देशभरातील घाऊक महागाई निर्देशांक तब्बल 12.54 टक्क्यांवर पोहोचला. घाऊक महागाईचा निर्देशांक दोन अंकी म्हणजे 10 टक्के पिंवा त्याहून अधिक नोंदवला जाण्याचा हा सलग सातवा महिना आहे. महागाईने जुन्या सरकारच्या कालखंडातील तमाम विक्रम मोडीत काढून महागाईच्या बाबतीत नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. अनेक भाज्या तर आता सफरचंदापेक्षा अधिक दराने विकल्या जात आहेत. वाटाणा आणि टोमॅटो तर हिवाळ्याच्या हंगामात खूप स्वस्तात विकले जाते. मात्र, आज या दोन्ही वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याचे शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून म्हटले आहे.  

हिवाळ्यात 25 रुपये किलोने मिळणारा टोमॅटो आता 100 रुपये किलोवर पोहोचला आहे. अंदमान-निकोबारमध्ये तर टोमॅटो 113 रुपये किलो म्हणजे पेट्रोलपेक्षाही महाग विकला जात आहे. वाटाणाही 150 ते 200 रुपये किलोने विकला जात आहे. देशाच्या अनेक भागांत लांबलेल्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे यंदा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. खासकरून दक्षिणेकडील राज्यांतून होणारी टोमॅटोची आवक घटली. त्यामुळे टोमॅटोच्या भावाने शंभरी गाठली, असे सांगितले जात आहे. ते खरे असेलही, मात्र प्रश्न केवळ टोमॅटोचा नाही, सर्व प्रकारचा भाजीपाला आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर जनतेच्या आवाक्यापलीकडे गेल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. 

हेच मौन महागाईच्या आगडोंबात भस्मसात होईल 

दिवसेंदिवस भरारी घेणारी महागाई आणि भाववाढीच्या हल्ल्यांनी देशातील सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. महागाईच्या वणव्यात जनता होरपळून निघत असताना सरकार पक्षाने मात्र तोंडाला कुलूप लावले आहे. एरवी महागाईच्या प्रश्नावर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत आकाशपाताळ एक करणारी मंडळी आज सत्तेच्या सिंहासनाचे सुख उपभोगत आहे. महागाईच्या मुद्दय़ावर सत्ताधारी पक्षात सन्नाटा पसरलेला असला, तरी नजीकच्या काळात हेच मौन महागाईच्या आगडोंबात भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाकेंद्र सरकारपेट्रोल