टॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्याला अटक

By Admin | Updated: August 13, 2015 00:19 IST2015-08-13T00:19:42+5:302015-08-13T00:19:42+5:30

दागिने गहाण ठेवून मेहुण्याच्या पत्नीला गंडा घालणाऱ्या टॉलीवूडच्या निर्मात्याला पोलिसांनी अटक केली आहे. टॉलीवूडमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी त्याने नातेवाईकालाच गंडवले होते

Tollywood filmmaker arrested | टॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्याला अटक

टॉलीवूडच्या चित्रपट निर्मात्याला अटक

नवी मुंबई : दागिने गहाण ठेवून मेहुण्याच्या पत्नीला गंडा घालणाऱ्या टॉलीवूडच्या निर्मात्याला पोलिसांनी अटक केली आहे. टॉलीवूडमध्ये चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी त्याने नातेवाईकालाच गंडवले होते. अखेर वाशी पोलिसांनी चेन्नईमधून त्याला अटक केली आहे.
रेजी प्रभाकर (४२) याच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात जुलै २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्याने २०११ मध्ये मेहुण्याच्या पत्नीलाच १६ लाख रुपयांचा गंडा घातला होता. लग्नसोहळ्यात वापरायचे कारण सांगून उषा अनिलकुमार यांचे सोन्याचे दागिने घेतले होते. हे दागिने परस्पर गहाण ठेवून त्यावर ११ लाख रुपयांचे कर्ज घेऊन तो चेन्नईला पळाला. टॉलीवूडमध्ये निर्माता म्हणून झळकण्याची हौस असल्याने, त्याने एक तमिळ चित्रपट काढला होता. मात्र चित्रपट आपटल्याने तो पुन्हा नवी मुंबईत परतला.
पैशासाठी होणारा कुटुंबीयांचा तगादा टाळण्यासाठी त्याने पत्नीसोबत घटस्फोटाचा बनाव केला. दागिने परत देत नसल्याने अखेर नातेवाईकाने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली. गेल्या वर्षभरापासून वाशी पोलीस त्याचा शोध घेत होते.
दरम्यानच्या काळात तो दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणात चेन्नईत व्यस्त होता. स्वत: अभिनेता असलेला त्याचा हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात टॉलीवूडमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुरज पाडवी, सहाय्यक निरीक्षक सुशीलकुमार गायकवाड, वासुदेव मोरे, हवालदार गोरख कोकाटे, नीलेश किंद्रे, अमृत उदमले यांच्या पथकाने चेन्नईमधून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गहाण ठेवलेले दागिने जप्त केल्याचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले.
चित्रपट निर्मितीसाठीच हा संपूर्ण प्रकार केल्याची कबुलीही त्याने दिल्याचे उमाप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे यांच्यासह तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Tollywood filmmaker arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.