ठप्प पडलेल्या शौचालयाचे काम अखेर सुरू
By Admin | Updated: December 12, 2015 01:55 IST2015-12-12T01:55:59+5:302015-12-12T01:55:59+5:30
विक्रोळी कन्नमवारनगर- २ येथील स्वयंभू हनुमान नगरातील ठप्प पडलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या कामाबाबत ‘लोकमत’ मधून वाचा फोडल्यानंतर येथील कामाला वेग आला आहे.

ठप्प पडलेल्या शौचालयाचे काम अखेर सुरू
मुंबई: विक्रोळी कन्नमवारनगर- २ येथील स्वयंभू हनुमान नगरातील ठप्प पडलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या कामाबाबत ‘लोकमत’ मधून वाचा फोडल्यानंतर येथील कामाला वेग आला आहे. गेल्या दीड वर्षापासून ठप्प असलेले काम अखेर सुरु झाल्यामुळे स्थानिकांनाही दिलासा मिळाला आहे.
वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत विक्रोळी कन्नमवारनगर २ येथील स्वयंभू हनुमाननगरातील वाढत्या लोकवस्तीसाठी नवीन शौचालय बांधकामाला महापालिकेकडून परवानगी मिळाली त्यानंतर येथील शौचालयाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
जुलै २०१४ रोजी येथील जुने सार्वजनिक शौचालय पाडण्यात आले व चाळीच्या परीसरातच तात्पुरते १२ शौचालय बांधण्यात आले. पण सहा महिने काम पूर्ण करण्याची हमी देऊनही महिन्याभरातच येथील टाकीचे काम अर्धवट टाकून कामगार निघून गेले. इतकेच नाही तर येथील सामानही कामगार हळुहळु परत नेऊ लागले. बंद पडलेल्या कामाबाबत विकासकाकडे विचारणा केल्यावर त्याच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे येथील नागरीक अस्वस्थ होते.
बंद पडलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी स्थानिकांनी अनेकदा महापालिका कार्यालयात फेऱ्या मारल्या. पण त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे मिळाली. तात्पुरत्या बांधण्यात आलेल्या शौचालयाची संख्याही तेथील लोकवस्तीस अपुरी पडत असल्यामुळे रहिवाशांमध्येही लहान-मोठे खटके उडू लागले.
आसपासच्या परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यावर अन्य रहिवाशांनी आक्षेप घेतल्यामुळे येथील रहिवाशांची नाचक्की होत होती, चौकशी अंती हे काम विकासकाच्या भांडणामुळे बंद झाल्याचे कळाले.