मोहोपाड्यात शौचालयाची तोडफोड
By Admin | Updated: April 19, 2015 23:14 IST2015-04-19T23:14:06+5:302015-04-19T23:14:06+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय उभारण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी अजूनही कित्येक गावांमध्ये घरोघरीच काय तर

मोहोपाड्यात शौचालयाची तोडफोड
मोहोपाडा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरोघरी शौचालय उभारण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी अजूनही कित्येक गावांमध्ये घरोघरीच काय तर सार्वजनिक शौचालयेही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मोहोपाडा मासळी मार्केटजवळील शौचालयाचे काम सुरू असून बाजूलाच तात्पुरती शौचालये उभी केल्याने या शौचालयांचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होऊ लागला आहे. संतप्त नागरिकांनी शौचालयाची तोडफोड केली.
मोहोपाडा पंचशीलनगर येथील रहिवासी गेली अनेक वर्षे चांगल्या शौचालयाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र १९९८ मध्ये तत्कालीन खासदार गोयल यांच्या खासदार निधीतून मोहोपाडा पंचशीलनगर येथे सुलभ शौचालय बांधण्यात आले होते. नागरिकांनी स्वच्छता न राखल्याने या शौचालयाची दुरवस्था झाली होती. नागरिकांचा प्रश्न सोडविण्याकरिता शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी लक्ष घालून आमदार निधीतून या भागात नवीन शौचालय उभारण्याचा ठेका दिला, मात्र ठेकेदाराकडून हे काम संथगतीने सुरू असल्याने पंचशीलनगरमधील रहिवाशांची गैरसोय झाली. ती दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने या शौचालयाच्या बाजूलाच तात्पुरती शौचालये उभी केली.
परंतु दिवसेंदिवस या शौचालयाचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना होवू लागला आहे. रहिवाशांचा उद्रेक झाल्याने त्यांनी शौचालयाची तोडफोड केली. ही बातमी कळताच माजी जि.प.सदस्य सुरेश म्हात्रे व सरपंच शशिकांत मुकादम यांनी परिस्थितीची पाहणी करून नव्या शौचालयांचे बांधकाम लवकरात लवकर करण्याचे कंत्राटदाराला सूचित केले. (वार्ताहर)